गणपतीच्‍या मुर्तीची विटंबना करणाऱ्याला अटक

औरंगाबाद,५ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-गणपतीच्‍या मुर्तीची विटंबना करणाऱ्याला क्रांतीचौक पोलिसांनी सोमवारी दि.५ पहाटे अटक केली. त्‍याला ७ सप्‍टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश अतिरिक्त मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी एम.आर. देशपांडे यांनी दिले. अक्षय अशोक बनसोडे (३०, रा. भोईवाडा) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात भोईवाडा येथे राहणाऱ्या पवन राजाराम सुर्यवंशी (१७) याने फिर्याद दिली. त्‍यानूसार फिर्यादी व त्‍याच्‍या मित्रांनी परिसरात जय शंभु नारायण गणेश मंडळाची स्‍थापना करुन दीड फुटाच्‍या गणपतीची मुर्ती बसवली होती. ४ सप्‍टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्‍या सुमारास आरोपी अक्षय बनसोडे हा फिर्यादी व त्‍याच्‍या मित्राने स्‍थापन केलेल्या मंडळाजवळ दारु पिवून आला. त्‍यामुळे फिर्यादीच्‍या आजीने दारु पिवून गणपतीच्‍या मुर्तीजवळ जावू नको असे सांगितले. त्‍यावर आरोपीने फिर्यादीसह मित्र व आजीला शिवीगाळ केली. तसेच माझे कोणी काही वाकडे करु शकत नाही. माझ्यावर अगोदार बरेच गुन्‍हे आहेत, मी एका दिवसात सुटून वापस येतो, पोलिस देखील माझे काही वाकडे करु शकत नाही, असे म्हणत आरोपीने गणपतीच्‍या मुर्तीचा एक हात तोडला तसेच स्‍टेजचा कपडा देखील फाडला.या प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील दत्तात्रय काठुळे यांनी आरोपीने मुर्तीची विटंबना करण्‍याचा नेमका उद्देश काय होता, गुन्‍हा कोणाच्‍या सांगण्‍यावरुन केला काय याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.