नदीच्या पात्रातून जाण्यासाठी रस्ता नसतानाही लाकडाच्या ओंडक्यावर चालत जीव धोक्यात टाकून लसीकरण

खुलताबाद,२७ नोव्हेंबर/प्रतिनिधी :-प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ अंतर्गत उपकेंद्र पळसवाडी येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोव्हीड  लसीकरणासाठी पळसवाडी गट नंबर ३६७  उत्तम रंगनाथ ठेंगडे , जनाबाई उत्तम ठेंगडे यांच्या शेतात  जाण्यासाठी रस्ता नसतानाही चक्क नदीच्या पात्रातून लाकडाच्या ओंडक्यावर चालत जीव धोक्यात टाकून मोठी कसरत करावी लागली. या धोकादायक परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी शेतात राहणाऱ्या नागरिकांचे लसीकरण केले आहे.

पळसवाडी येथील आरोग्य उप केंद्र अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ बलराज पांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हीड वॅक्सिन डोस देण्याकरिता शेत वस्ती घरोघर जाऊन वयोवृध्द नागरिकांना सर्वे करून  लस देण्याचे काम चालू आहे.  आरोग्य केंद्राअंतर्गत शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता प्रयत्न केले जात आहे. या कामी आरोग्य सेविका  मनीषा अहिरे,  रवि खंडागळे , ग्रामसेविका  के.एस. गवारे , आशा कार्यकर्ती उषा म्हसरुप, प्रफुल पवार हे परिश्रमपूर्वक काम करत आहेत. त्यांना  सरपंच दगडु भेंडे, उपसरपंच सोमनाथ ठेंगडे , ग्रामपंचायत सदस्य महेश दहीवाळ माजी उपसरपंच सुधाकर दहिवाळ, छाया  पवार, कल्पना म्हसरूप, शशिकलाबाई ठेंगडे, ग्रामपंचायत कर्मचारी योगेश ठेंगडे विलास ठेंगडे यांचे मोलाचे योगदान मिळत आहे.