नवीन पाणीपुरवठा योजनेच्या निगराणीसाठी आता समिती:विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर अध्यक्ष- उच्च न्यायालय

औरंगाबाद,२२ जुलै /प्रतिनिधी :-औरंगाबाद शहरासाठी 1680 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. रवींद्र घुगे यांनी दिले आहेत.

विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी समितीचे अध्यक्ष असावे आणि राज्यशासनाने किमान सहा महिने त्याची बदली करू नये असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. समितीने पंधरा दिवसांतून एकदा बैठक घ्यावी आणि अहवाल सोळाव्या दिवशी न्यायलयात सुनावणीप्रसंगी सादर करावा असेही आदेशित करण्यात आले आहे. समितीची पहिली बैठक 29 जुलै रोजी घेण्यात यावी आणि 1ऑगस्टला सुनावणीप्रसंगी समितीने अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या इंच-न-इंच कामासंबंधीच्या प्रगतीची नोंद महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घ्यावी असे निर्देशही दिलेले आहेत. पाणीपरवठा योजनेचे जलद गतीने काम व्हावे यासाठी विविध शासकीय कार्यालयांमध्ये समन्वय असावा अशी न्यायालयाचे म्हणणे होते. नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामातील तांत्रिक अडथळे दूर व्हावे यासाठी न्यायालयाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश दिले.

समितीमध्ये कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, आयुक्त महानगरपालिका औरंगाबाद, अधीक्षक अभियंता महावितरण, पोलीस अधीक्षक औरंगाबाद, न्यायालयाचे मित्र अ‌ॅड. सचिन देशमुख, प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आदींचा समावेश राहील.

नवीन जलवाहिनीच्या मार्गावर ओएनजीसीच्या वतीने गॅसची पाईपलाईन टाकण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येत असल्याचे सुनावणीप्रसंगी निदर्शनास आणून दिले. न्यायलयाने संबंधित कंपनीला प्रतिवादी करण्याचे आदेश दिले.

समितीने जलवाहिनीच्या मार्गात येणारे अडथळे दूर करावेत. काही तांत्रिक अडचणी येत असतील तर त्याचा कायदेशिर पद्धतीने निपटारा करून जलवाहिनीचे काम जलद गतीने कसे होईल याबाबत काळजी घ्यावी अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली. न्यायालयाचे मित्र अॅड. सचिन देशमुख यांनी शहरातील असंख्य अनधिकृत नळ जोडण्यांबाबत कारवाई करण्याची मागणी केली. यासंबंधी न्यायालय विचार करेल असे मत व्यक्त करण्यात आले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने अ‌ॅड. विनोद पाटील यांनी निवेदन करताना पाणीपुरवठा सात दिवसांवरून चार दिवसांवर आल्याचे स्पष्ट केले. मजिप्र आणि मनपाच्या माध्यमातून नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 170 कि.मी. जलवाहिनी शहरात पाणीपुरवठ्यासाठी टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या अनेक भागात सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यापूर्वी स्थापन केलेल्या जिल्हा स्तरीय समितीच्या मार्गदर्शनाखाली सात दिवसाऐवजी चाौथ्या दिवशी पाणीपुरवठा केला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.