राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याला ईडीचा दणका!

मुंबई ,२२ जुलै /प्रतिनिधी :-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते खासदर  प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील मालमत्तेवर छापामारून ईडीने कारवाई केली. कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याचा हस्तक असलेला व मुंबई बॉंम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मिर्ची प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. प्रफुल पटेलांवर मनी लॉड्रिंगचे आरोप असुन २०१९ मध्ये देखील पटेलांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती.
 
 
ईडीकडून पटेलांच्या मुंबईच्या वरळी येथील सिजे हाऊस या अलिशान इमारतीतील चार मजल्यांवर तात्पुरत्या जप्तीचा बडगा उगारण्यात आलेला आहे. वरळीतील सिजे हाउस या मालमत्तेचा पुनर्विकास प्रफुल पटेल यांच्या कंपनीने केला होता. या प्लॉटवर इक्बाल मिर्ची याची सुद्धा जागा होती. पुनर्विकासानंतर सिजे हाऊसमध्ये मिर्ची याला १४ हजार चौरस फुट क्षेत्रफळ असलेले दोन मजले देण्यात आले.

२००७ मध्ये  सिजे हाऊस बांधकामासाठी एक करार झाला होता, ज्यावर प्रफुल पटेल यांची स्वाक्षरी आहे. पटेल कुटुंबाच्या मिलेनियन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत व मिर्चीमध्ये हा करार झालेला होता. २०१३ मध्ये  लंडन येथे इक्बाल मिर्ची याचे निधन झाले. त्याने ड्रग्स तस्करी,हवालाच्या माध्यमातून पैसा कमावला आहे.