ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-शिंदे गटाला सर्वाधिक यश

ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा  भाजपाच नंबर वन

२६५१ ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला ;राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वाधिक घोडदौड – जयंतराव पाटील

औरंगाबाद,२० डिसेंबर / प्रतिनिधी :-महाराष्ट्रात आज ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाले. सरपंचाची निवड थेट जनतेतून असल्याने कोणती ग्रामपंचायतीवर कोणत्या पक्षाच्या झेंडा फडकतो, याकडे साऱ्यांचे लक्ष होते. या निकालानंतर भाजपने सर्वाधिक १९६६ ग्रामपंचायतींवर, तर राष्ट्रवादी काँग्रेसने १४४६, शिवसेना शिंदे गटाने ८०२, काँग्रेसने ८३८ तर शिंदे गटाने ६६१ ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवला आहे. तसेच, काही इतर आघाड्यांनी १०६८ ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली. राज्यातील ६१६ ग्रामपंचायती याआधीच बिनविरोध झाल्या आहेत.

तब्बल ३५ जिल्ह्यांमध्ये ७७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी सरासरी ७४ टक्के मतदान झाले होते.भाजपा, शिंदे गटाकडे सर्वाधिक सरपंच पदे असून शिंदे गटाने ठाकरे गटाला खिंडीत गाठले असून ठाकरे गट पाचव्या क्रमांकावर फेकला गेला आहे.ग्रामपंचायतमध्ये भल्या भल्यांना सत्ता राखता आलेली नाही. गुजरात निवडणुकीच्या विजयाचे श्रेय मिळालेले प्रदेशाध्यक्ष पाटील यांना त्यांची ग्राम पंचायत राखता आलेली नाही. त्यांच्या मुलीचा पराभव झाला.

काही ठराविक निकाल ज्यांनी लक्ष वेधून घेतले .उस्मानाबाद जिल्ह्यातील कावळेवाडी आणि पूर्वी ग्रामपंचायतमध्ये ‘आप’ने विजय मिळवला आणि ग्रामपंचायतीत पहिल्यांदाच ‘आप’चा प्रवेश झाला आहे.

पालघरमध्ये गुंडले ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला. मनसेचे जयेश आहाडी सरपंचपदी निवड झाली. सातपाटीमध्येही मनसेचे आठ उमेदवार निवडून आले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आनंद व्यक्त करताना म्हणाले की, “विजयाबद्दल नक्कीच आनंद आहे, आता हा आकडा वाढवत जावो.”

ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा  भाजपाच नंबर वन-प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये २४८२ ग्रामपंचायती जिंकून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी नंबर वन ठरली आहे. या यशाबद्दल आपण कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि मतदारांचे आभार मानतो, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सांगितले.

ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपा – बाळासाहेबांची शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी युतीला कौल दिला आहे. उपलब्ध आकडेवारी ध्यानात घेता भाजपाचा दणदणीत विजय झाल्याचे दिसते. सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला ८४२ ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले आहे. आमच्या विरोधी पक्षांच्या एकत्रित संख्येपेक्षा अधिक सरपंच भाजपा – बाळासाहेबांची शिवसेना युतीचे निवडून आले आहेत. सत्तांतरानंतर यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही मतदारांनी युतीला पसंती दिली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात असताना आता महाराष्ट्रातही त्यांच्या विचारांच्या सरकारचे काम राज्यातील जनतेला पसंत पडले आहे. आपण या विजयाबद्दल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन करतो, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, राज्यातील ग्रामीण जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत पुनःपुन्हा शिंदे फडणवीस सरकारला पसंती दिली आहे. याच पद्धतीने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही युती विजयी होईल. तसेच महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीत शहरी मतदारही भाजपा – बाळासाहेबांची शिवसेना युतीला कौल देईल याची खात्री आहे.

२६५१ ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला ;राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वाधिक घोडदौड – जयंतराव पाटील

महाराष्ट्रात अधिकृत घोषित झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास १३०० ग्रामपंचायतीवर आणि महाविकास आघाडीचे इतर दोन घटक पक्ष लक्षात घेता २६५१ ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी माध्यमांना दिली.

शिवसेना आणि भाजप यांच्या मिळून साधारणपणे २२०० ग्रामपंचायतीवर झेंडा फडकला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ग्रामीण भागातील जनतेने फार मोठ्याप्रमाणावर साथ दिली आहे असेही जयंतराव पाटील म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे त्यामुळे आपल्या लक्षात येईल की दलबदलूचे राजकारण महाराष्ट्र मान्य करत नाही. साम-दाम-दंड-भेद वापरून, सत्ता वापरून, सत्तेचा दुरुपयोग करून देखील महाविकास आघाडीचा पराभव भाजप व शिंदे गट करु शकत नाही हे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात सिद्ध झाले आहे असा टोलाही जयंतराव पाटील यांनी लगावला.

अजून काही १४०० ग्रामपंचायतीचे निकाल यायचे आहेत. त्यामुळे भाजप – शिंदे गटातील अंतर वाढेल. महाराष्ट्रातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या पक्षांना पुन्हा एकदा प्राधान्य दिले आहे अशी खात्री व्यक्त करतानाच जयंतराव पाटील यांनी महाराष्ट्रातील जनतेचे जाहीर आभार मानले आहेत.

साम-दाम-दंड-भेद वापरूनदेखील महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि शिंदे गटाचा पराभव केला आहे. हे या आकड्यावरून सिध्द होत आहे. भाजप त्यांच्याबाजूने निकाल लागले आहेत असे बोलत असले तरी चार – साडेचार वाजता निकाल जाहीर व्हायच्या आधीच एकमेकांना लाडू भरवत होते.आम्ही सर्व निकाल लागण्याची वाट बघणार आहोत. पूर्ण निकाल लागल्यावर अधिकृत आकडेवारी देण्याचे काम करेन असेही जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्यावतीने जनतेने दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल जयंतराव पाटील यांनी आभार मानले. उद्या सात हजार सातशे ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर होतील त्यावेळी खरी आकडेवारी आपल्यासमोर मांडण्यात येईल असे स्पष्ट करतानाच महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी गड, ग्रामपंचायत राखल्याबद्दल जयंतराव पाटील यांनी त्यांचे

अभिनंदन केले.