हा विजय विरोधकांना त्यांची जागा दाखवणारा; ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर काय म्हणाले मुख्यमंत्री?

नागपूर ,२० डिसेंबर/ प्रतिनिधी :-ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये शिंदे गट आणि भाजप पक्षाचे सर्वाधिक सरपंच निवडून आले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन करत विरोधकांवर टीकादेखील केली. तसेच, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी पेढे वाटत हा विजय साजरा केला. ‘महाविकास आघाडीच्या तुलनेत आमच्या युतीला मिळालेले यश हे विरोधकांना त्यांची जागा दाखवणारे आहे,’ अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली. ते पुढे म्हणाले की, “गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये आम्ही जी कामे केली आहेत, त्याची ही पोचपावती देणारा निकाल आहे.”

“आजच्या निकालामध्ये हे स्पष्ट दिसते की, आमच्या कामावर ग्रामीण लोकांनी विश्वास टाकला आहे. मी मतदारांचे मनापासून अभिनंदन करतो. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमचे सर्व आमदार आणि कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली होती. त्यामुळे त्यांचेही आभार मानतो. गेल्या ५ महिन्यांमध्ये आपल्या सरकारने जे निर्णय घेतले ते लोकाभिमुख निर्णय घेतले. शेतकरी, कामगार, कष्टकरी, विद्यार्थी, माता-भिगिनी या सर्वांचे सन्मान करणारे हे सरकार आहे”, असे मत मुख्यंमत्री एकनाथ शिंदे व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, “गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट मतांनी विजय या निवडणुकीत मिळाला. विरोधीपक्षाच्या नेत्यांनी, ‘आम्ही शेतकऱ्यांना काय दिले?’ असे विचारत होते, त्यांना हे चोख उत्तर आहे. हा विजय विरोधकांना त्यांची जागा दाखवणारा आहे. आमच्या सरकारने जे निर्णय घेतले ते लोकाभिमुख होते हेही यामुळे लक्षात येते.”