६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; ‘गोष्ट एका पैठणीची’ ठरला सर्वोत्तम मराठी चित्रपट

मध्य प्रदेशने पटकावला सर्वाधिक चित्रपट स्नेही राज्याचा पुरस्कार

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सुरिया आणि अजय देवगण यांना विभागून

‘मी वसंतराव’ साठी राहुल देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा तर अय्यप्पम कोशियम चित्रपटातल्या गीतासाठी नाचम्मा यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार

नवी दिल्ली,२२ जुलै /प्रतिनिधी :- वर्ष 2020 साठीच्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज दिल्ली येथे करण्यात आली. यामध्ये ‘गोष्ट एका पैठणीची’ (पैठणीवर कथा) या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘टकटक’ आणि ‘सुमी’ या मराठी चित्रपटातील बाल कलाकारांना उत्कृष्ट बाल कलाकारांचा पुरस्कार जाहीर, तर ‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ या हिंदी चित्रपटाला सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला असून याच चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अजय देवगण यांना जाहीर झाला आहे.

येथील नॅशनल मीडिया सेंटर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये विविध श्रेणीत मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे.

‘गोष्ट एका पैठणीची’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

प्लानेट मराठीतर्फे निर्मित ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शंतनू गणेश रोडे यांनी केले आहे.  या चित्रपटाला एक लाख रुपयांचा रजत कमळ पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ या हिंदी चित्रपटाला सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण फिल्मस् आणि दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. या दोघांनाही सुवर्ण कमळ आणि दोन लाख रूपये रोखीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अजय देवगण आणि तामिळ अभिनेता सुर्या (चित्रपट – सोराराई पोट्टरू) यांना संयुक्तरित्या उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप रजत कमळ आणि पन्नास हजार रुपये असे आहे. तानाजी या चित्रपटाला उत्कृष्ट वेशभुषेसाठीही पुरस्कार जाहीर झाला असून वेशभूषाकार नचिकेत बर्वे आणि महेश र्शेला यांना रजत कमळ आणि पन्नास हजार रूपये असा पुरस्कार जाहीर झाला आहे.

महिला व बालकांच्या सक्षमीकरणावर आधारित तसेच अनिष्ट चालीरीतींवर बोट ठेवणारा ‘फनरल’  या मराठी चित्रपटाला सामाजिक विषयावरील  श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे निर्माते बीफोर-आफटर इंटरटेंमेंट व दिग्दर्शक विवेक दुबे यांना एक लाख पन्नास हजार रुपयांचा रजत कमळ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘टकटक’आणिसुमी’या मराठी चित्रपटातील बाल कलाकारांना उत्कृष्ट बाल कलाकारांचा पुरस्कार जाहीर

‘टकटक’ आणि ‘सुमी’ या मराठी चित्रपटातील बाल कलाकारांना उत्कृष्ट बाल कलाकारांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘सुमी’ या सिनेमातील आकांक्षा पिंगळे आणि दिव्येश इंदुलकर या बालकांना आणि ‘टकटक’ या सिनेमासाठी अनिष मंगेश गोसावी यांना रजत कमळ पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘सुमी’ या चित्रपटाला उत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती हर्षला कामत एंटरटेंमेंट यांनी केली आहे, तर दिग्दर्शन अमोल गोळे यांनी केले आहे. या चित्रपटाला  सुवर्ण कमळ आणि प्रत्येकी एक लाख पन्नास हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘जून’, ‘गोदाकाठ’ आणि ‘अवांछित’ या तीनही चित्रपटांना विशेष ज्युरी मेंशन पुरस्कार जाहीर झालेला आहे. जून चित्रपटासाठी सिद्धार्थ मेनन या अभिनेत्याला तर गोदाकाठ व अवांछित या दोन्ही चित्रपटांसाठी अभिनेते किशोर कदम यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

‘मी वसंतराव’ या मराठी चित्रपटातील पार्श्वगायनासाठी राहूल देशपांडे यांना रजत कमळ पुरस्कार जाहीर झालेला आहे. तसेच या चित्रपटाला उत्कृष्ट ऑडिओग्राफीचा पुरस्कारही जाहीर झालेला आहे. या चित्रपटाचे ध्वनी संयोजक अनमोल भावे यांना रजत कमळ आणि पन्नास हजार रुपये रोख पुरस्कार जाहीर झाला आहे.

हिंदी सिनेमा ‘सायना’तील गीतासाठी गीतकार मनोज मुंतशिर यांना रजत कमळचा पुरस्कार जाहीर झालेला आहे.

नॉन फिचर फिल्म या श्रेणीत मराठी ‘कुंकुमार्चन’ चित्रपटाला पुरस्कार जाहीर

कौटुंबिक मुल्यांवर आधारित ‘कुंकुमार्चन’ या मराठी चित्रपटाला कौटुंबिक मुल्यांवर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती  स्टुडिओ फिल्मी माँक्स आणि दिग्दर्शन अभिजित दळवी यांनी केले आहे. या दोघांनाही प्रत्येकी पन्नास हजार रूपयांचा रजत कमळ पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘जून’ला राष्ट्रीय पुरस्कार

चित्रपट क्षेत्रातील विविध विभागातील मान्यवरांना दरवर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार शंतनु गणेश रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला प्रदान करण्यात आला असून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा स्पेशल ज्युरी मेंशन अवॉर्ड ‘जून’ चित्रपटासाठी सिध्दार्थ मेनन याला मिळाला आहे. ‘गोष्ट एका पैठणीची’ आणि ‘जून’ या दोन्ही चित्रपटांची निर्मिती ‘प्लॅनेट मराठी’ची असून गोष्ट ‘एका पैठणीची’ मध्ये सायली संजीव आणि सुव्रत जोशी प्रमुख भूमिकेत आहे. तर या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग, चिंतामणी दगडे यांनी, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स आणि लेकसाईड प्रोड्कशन या बॅनर अंतर्गत केली आहे.

सायली संजीव म्हणते, “चित्रपटातील कामाचे चीज झाले आहे. चित्रपटासाठी मी विशेष मेहनत घेतली आहे. माझ्यासाठी चित्रपट खूप स्पेशल आहे. मी हा पुरस्कार माझ्या वडिलांना समर्पित करते.” तर चित्रपटाचे दिग्दर्शक शंतनु रोडे म्हणतात, ‘’माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. याचे श्रेय संपूर्ण टीमला जाते. सगळ्यांनीच यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि आज स्वप्न पूर्ण झाले.’’

पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सिद्धार्थ मेनन म्हणतो, “मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद होतोय. स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटतेय. हा पुरस्कार मी आमच्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला समर्पित करतो. मला ‘जून’ चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला याचा सर्वात जास्त आनंद आहे.”सुहृद गोडबोले, वैभव खिस्ती दिग्दर्शित या चित्रपटाची कथा निखिल महाजन यांची आहे.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “प्लॅनेट मराठी नेहमीच दर्जेदार आशय बनवण्याच्या प्रयत्नात असते. या दर्जेदार आशयाच्या आधारावरच प्लॅनेट मराठीच्या दोन चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. सर्वांसाठीच हा आनंद देणारा क्षण आहे. हे पुरस्कार आमच्या कामासाठी पोचपावती आहे. यापुढे आणखी दर्जेदार चित्रपट बनवण्याचे प्रयत्न करू.

मराठी मुलुखाच्या प्रतिभेची मोहर उमटवणाऱ्या कलावंताचा अभिमान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठी मुलुखाच्या प्रतिभेची मोहर उमटवणाऱ्या कलावंताचा अभिमान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :- ‘मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी मुलुखाच्या प्रतिभेची मोहर उमटवणाऱ्या कलावंताचा अभिमान आहे,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कांरामध्ये बाजी मारणाऱ्या विविध श्रेणीतील चित्रपटांचे निर्माता, दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ज्ञ आदींचे अभिनंदन केले आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने आज 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मराठी चित्रपट ‘सुमी’ ने पटकावला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून ख्यातनाम गायक राहूल देशपांडे यांना ‘मी वसंतराव’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

‘गोष्ट एका पैठणीची’ (सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट), ‘फनरल'(सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट), ‘जून, गोदाकाठ, अवांछित’ (तीनही विशेष उल्लेखनीय चित्रपट) पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. नरवीर तानाजी मालुसरेंच्या पराक्रमांवर आधारित ‘तानाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार आणि त्यातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल अजय देवगण यांचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कार पटकावणाऱ्या अनिश गोसावी, आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर यांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. कोविड महामारीमुळे 2020 हे वर्ष विशेष आव्हानात्मक होते मात्र  तरीही नामांकनामधील चित्रपटांनी  उत्कृष्ट काम केले आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले. अत्यंत परिश्रमपूर्वक प्रवेशिका तपासल्याबद्दल आणि पुरस्कारांसाठी उत्कृष्ट चित्रपटांची निवड केल्याबद्दल त्यांनी परीक्षकांचे आभार मानले. 

भारतीय सिने जगतातील दिग्गज चित्रपटनिर्माते आणि मान्यवरांचा परीक्षकांमध्ये समावेश होता. कथाबाह्य चित्रपट परीक्षक अध्यक्ष चित्रार्थ सिंह, सर्वोत्कृष्ट लेखन परीक्षक अध्यक्ष अनंत विजय, , फीचर फिल्म परीक्षक (सदस्य – मध्यवर्ती पॅनेल) धरम गुलाटी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव  नीरजा शेखर यांच्या उपस्थितीत पुरस्कारांची घोषणा केली