पत्नीच्या आत्महत्त्या प्रकरणी पतीस सात वर्षाची शिक्षा ; अन्य पाच जण निर्दोष

वैजापूर न्यायालयाचा निकाल 

वैजापूर,२०जुलै /प्रतिनिधी :- हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने पतीस  सात वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास आणखी एक वर्ष  साध्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. 

हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपावरून  त्यास दोन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास. चार महिने सक्तमजुरीची शिक्षा  ठोठावण्यात आली आहे.  दिनेश भिमराज सोनवणे (रोजेकर) (32) रा. माळी गल्ली वैजापूर असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.एम. आहेर यांनी बुधवारी हा निकाल दिला. या प्रकरणातील आणखी पाच आरोपींची न्यायालयाने  सदोष पुराव्याअभावी  निर्दोष मुक्तता केली.  भीमराज सोनवणे (सासरा), रत्‍नाबाई सोनवणे (सासू), दत्तात्रय सोनवणे (दिर) शुभांगी सोनवणे (जाऊ) व देवेंद्र सोनवणे (दिर)  सर्व राहणार वैजापूर यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

वैजापूर शहरातील माळी गल्ली येथील  दिनेश भिमराज सोनवणे याचे 2009 मध्ये अहमदनगर ज जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक. येथील  सोमनाथ बनसोडे यांची मुलगी अर्चना कशी झाले होते. सुरुवातीचे तीन महिने चांगली वागणुक दिल्यानंतर सासरच्या मंडळींनी अर्चनाकडे तेलाचे दुकान टाकण्यासाठी कांद्याची चाळ बांधण्यासाठी व शेतात ठिबक सिंचन संच घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली.  याबाबत माहिती मिळाल्यानंतर  वडिलांनी नातेवाईक नातेवाईकांकडून एक लाख रुपये हात उसने घेऊन त्यांना दिले. तरीही त्यावर समाधान न झाल्याने सासरच्या मंडळींनी अर्चनाचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. तिला उपाशी ठेवणे व मारहाण करण्याचे प्रकार वारंवार सुरु होते. या त्रासाला कंटाळुन अर्चना हिने 13 एप्रिल 2011 रोजी विषयी औषध पिऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तिचे वडील सोमनाथ बनसोडे यांच्या फिर्यादीवरुन पतीसह सहा जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सुनावणी दरम्यान, तपासी अंमलदार साहेबराव कडनोर यांच्यासह सहा जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. साक्षी पुराव्याच्या आधारे आरोपी दिनेश भिमराज सोनवणे यास न्यायालयाने दोषी धरून शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील नानासाहेब जगताप यांनी बाजू मांडली. वैजापूर पोलिस स्टेशनचे पैरवी अधिकारी जाधव यांनी त्यांना सहकार्य केले.