लाडगाव शिवारात कत्तलखान्यात जाणारी गोवंश जातीची जनावरे पकडली

पावणेआठ लाखांचा मुद्देमाल माल हस्तगत ; 21 जनावरे गेली कत्तलीसाठी

वैजापूर,२५ डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर शहरासह तालुक्यात कत्तलीसाठी जनावरांची तस्करी सुरू असल्याचा प्रकार पुन्हा एकदा उजेडात आला आहे. तरुणांनी ही वाहने पकडल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गोवंश जातीची 21 जनावरे वाहनातून कत्तलखान्यात घेऊन जाणारी तीन वाहने तालुक्यातील लाडगाव शिवारात पकडून पोलिसांनी सात लाख 69 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही जनावरे वैजापूर शहरातील कत्तलखान्यात घेऊन जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील दोन वाहनांतील 21 जनावरे कत्तलखान्यात अगोदरच पोहचविण्यात आली होती. त्यामुळे दोन वाहने पोलिसांना रिकामी मिळाली.  याप्रकरणी सहा जणांविरुद्ध  वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील लाडगाव शिवारातील एका पेट्रोलपंपाजवळ वाहनांमध्ये गोवंश जातीची मोठ्या प्रमाणावर जनावरे असल्याचे काही तरुणांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही माहिती वीरगाव पोलिसांना कळविली. त्यानुसार वीरगाव पोलिसांनी येथे जाऊन बघितल्यानंतर पिकअप ( क्रमांक एम.एच.14 ए. एस. 6474 ) वाहन आढळून आले. त्यामध्ये जर्सी जातीच्या चार गाईंसह 17 वासरे पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता त्याने आफताब सिराजुद्दीन पटेल ( रा. ममदापूर या. राहता जि. अहमदनगर ) असे नाव सांगून मी आणि उस्मानभाई ही जनावरे वैजापूर शहरातील कत्तलखान्यात घेऊन जात होतो. परंतु तरुणांनी लाडगाव शिवारात वाहन पकडल्यानंतर उस्मानभाई पळून गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिस पटेलची विचारपूस करीत असतानाच पुन्हा याच परिसरात लाडगाव येथील तरुणांनी आणखी दोन वाहने पकडली असता पिकअप ( क्रमांक एम.एच.13  ए.एन. 0338 ) व पिकअप ( क्रमांक एम.एच.17 ए.जी. 3251 ) ही दोन्हीही वाहने खाली होती. परंतु त्यात  जनावरांचे शेण व अन्य साहित्य मात्र पडलेले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता नाशिर लतीफ शेख व सय्यद या दोन्हीही वाहनांच्या चालकांनी आम्ही अनुक्रमे परवेज़ लालमियाँ कुरेशी व अख्तर मनियार या दोघांच्या मदतीने चार गायी व 17 वासरे वैजापूर येथील कत्तलखान्यात घेऊन आलो होतो. ही जनावरे कत्तलखान्यात पोहचवून येत असतानाच आमची वाहने पकडली गेल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान पोलिसांनी जनावरांसह  वाहने असा एकूण सात लाख 69 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी अगोदरच्या वाहनात पकडलेली एकूण 21 जनावरे ही गंगापूर येथील गोशाळेत नेऊन सोडली आहेत.  

खुलेआम कत्तलखाने सुरू

वैजापूर शहर परिसरात यापूर्वीही पोलिसांनी जनावरांची तस्करी करणारी अनेक वाहने पकडली. त्या पाठोपाठ आता वीरगाव पोलिसांनीही जनावरांच्या तस्करीचा भांडाफोड करून जंबो कारवाई केली. पकडलेल्या वाहनांच्या चालकांनी ही जनावरे आम्ही वैजापूर येथील कत्तलखान्यात घेऊन जात होतो व काही जनावरे कत्तलखान्यात सोडून आल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यामुळे शहरातील कत्तलखान्यात जनावरांची खुलेआमपणे   कत्तल सुरू असल्याचे यावरून सिद्ध होते. कत्तलखान्यात जनावरे आणण्यासाठी वैजापूरचे राहता कनेक्शन असल्याची बाबही समोर आली आहे.