त्या घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करा

राज्य अराजकतेकडे, पत्रकार, संपादक, ,बुद्धिजीवी वर्ग, सामान्य नागरिकांनी आता बोललं पाहिजे भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार

मुंबई ,२० सप्टेंबर /प्रतिनिधी :- राज्यात ‘तक्रारदार स्थानबद्ध आणि गावगुंड राज्यभर मुक्त’, अशी स्थिती निर्माण झाली असून राज्य अराजकतेकडे जात आहे. त्यामुळे  पत्रकार, संपादक, ,बुद्धिजीवी वर्ग, सामान्य नागरिकांनी आता बोललं पाहिजे. विरोधीपक्ष म्हणून आम्ही आमचे काम करीत आहोतच, असे सांगत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आज भाजपा प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांना ज्या पद्धतीने स्थानबद्ध करण्याबाबत जी घटना घडली, त्या एकुण सगळ्या घटनेची मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा,  अशी मागणी सरकारकडे त्यांनी केली.

          कोल्हापूर जिल्ह्यात मुश्रीफ यांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या हे जात होते. त्यावेळी सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून पोलीसांकडून रोखण्यात आले. किरीट सोमय्या यांनी आधीच सांगितलं की, आपण अमूक एका ठिकाणी तक्रार नोंदवण्यासाठी जाणार आहे. त्यावेळी काल मुंबईत शंभर सव्वाशे पोलीस नीलम नगरला घेराव घावून होते. हा पोलिसांचा गैरवावर नाही का? असा सवालही शेलारांनी केलाय. नोटीस म्हणून जी दाखवली जात होती, ती चुकीची आणि बोगस होती. इतकी गंभीर गोष्ट आहे की एका नागरिकाला, एका नेत्याला, एका माजी खासदाराला खोटी आणि बोगस नोटीस दाखवली जाते. ज्या जिल्ह्यातून ही नोटीस काढली असं सांगितलं जातं त्या पोलिसांनी मुंबईतील लोकल पोलिसांकडे एन्ट्री केली होती का? सोमय्यांना नोटीस दाखवण्याची पद्धत आणि खऱ्या नोटीसला उशीर का झाला? अशी प्रश्नांची सरबत्तीच शेलार यांनी यावेळी केली.

          या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सांगितले जाते या बाबत आपल्याला कोणती  ही माहिती नाही. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढते. पोलिस ठाण्यात तक्रार करायला जाण्यास रोखणे, त्यासाठी जे कारण दिले तेही संशयास्पद आहे. गुन्हेगार कोण हे माहिती आहे. कायदा आणि सुव्यवस्था कोण हाती घेईल हे माहिती आहे, तो कुठल्या पक्षाचा हे ही माहिती आणि मग कारवाई कुणावर आणि अटकाव कुणाला करताय? एकप्रकारे सरकारी यंत्रणेनं गुन्हा केला आहे. काही बातम्या समोर आल्या त्यात शिवसेनेचे नेते म्हणतात की मुख्यमंत्र्यांना अवगत केलं गेलं नव्हतं. त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची  मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज शेलार यांनी भाजपच्या वतीनं केली आहे.

          राज्यात गेल्या काही दिवसात असेच दुर्दैवी चित्र आहे. समाज माध्यमांवर जे बोलले त्यांना मारण्यात आले, एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांचा डोळा फोडण्यात आला, सरकार विरोधात बोलले म्हणून एका संपादकांना घरात घुसून अटक करण्यात आली, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे बोलणे दखलपात्र गुन्हा करुन त्यांना अटक करण्यात आली,  दहशतवादी कारवाया राज्यात होतात त्याची माहिती पोलिसांकडे नाही. हे सर्व पाहिले की, राज्य अराजकतेकडे जाते आहे.  अराजकता राज्यकर्ते माजवत आहेत. तर दुसरीकडे कायदेशीर मार्गाने तक्रार करणाऱ्या नागरिकांना अटकाव केला जातोय, किरीट सोमय्या यांना पोलीस ठाण्यात जाण्यात अटकाव करण्यात आला तसेच करुणा शर्मा या पोलीस ठाण्यात जात असताना त्यांना रोखण्यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले, ट्विटवर लखोबा लोखंडे नावाने ट्विटर खाते चालवणाऱ्याला अटक करुन न्यायालयात आणल्यानंतर शिवसैनिकांनी बेदम मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली हे पाहता राज्यातील जनता असहाय्य झाल्याचे चित्र आहे.  राज्यकर्ते अराजकता माजवत आहेत आणि जनता असहाय्य आहे, न्याय  कुणाकडे मागावा अशी स्थिती जनतेची आहे राज्य अराजकतेकडे जाते आहे त्यामुळे  त्यामुळे पत्रकार, संपादक, ,बुद्धिजीवी वर्ग, सामान्य नागरिकांनी आता बोललं पाहिजे. असे आवाहन आमदार अँड आशिष शेलार यांनी केले.

‘आता मुख्यमंत्र्यांनी म्हणावं,  मी बेजबाबदार…’

मुख्यमंत्री कोरोना काळात म्हणत होते की मी जबाबदार. पण आता मुख्यमंत्र्यांना गोष्टी माहिती नसल्याचं शिवसेनेचे नेते सांगतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता मी बेजबाबदार अशी घोषणा द्यावी, असा खोचक टोलाही शेलार यांनी लगावला आहे.