बंडखोर आमदारांसोबत गेलेल्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची शिवसेना कार्यकर्त्यांची मागणी

वैजापूरसह जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी भेट

वैजापूर,१२ जुलै /प्रतिनिधी :- शिवसेना पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह औरंगाबाद जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन सद्य परिस्थितीवर चर्चा करून बंडखोर आमदारांसोबत गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.

जिल्हयातील शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे व जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, नागरपालिकेतील शिवसेना गटनेते प्रकाश चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील निकम, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा लताताई पगारे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुका संघटक वर्षाताई जाधव, नंदकुमार जाधव,राजू गलांडे, अक्षय साठे, विठ्ठल डमाळे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी आज भेट घेतली व त्यांच्याशी जिल्हा व तालुक्यातील सद्यपरिस्थितीवर चर्चा केली.

यावेळी संघटनात्मक बदलावरही चर्चा होऊन बंडखोर आमदारांसोबत गेलेल्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची सूचना करण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यातील दोन मंत्र्यांसह पाच आमदार सोडून गेले असले तरी 99 टक्के शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे व त्यांच्यासोबत गेलेल्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या भेटीत उद्धवजींना सांगितले.आपल्याला नव्याने सुरुवात करावी लागेल असे सांगून पक्षसंघटना बांधणीसाठी आपण लवकरच औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे उध्दव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.