माजलगाव, बीड जाळपोळ प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ची स्थापना करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,१५ डिसेंबर / प्रतिनिधी :- मराठा समाजाच्या आरक्षण मागणीच्या अनुषंगाने झालेल्या आंदोलनादरम्यान ३० ऑक्टोबर २०२३ रोजी बीड जिल्ह्यात माजलगाव व बीड शहरात काही ठिकाणी जमावाकडून तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या. यामध्ये लोकप्रतिनिधींची निवासस्थाने सुद्धा जाळण्यात आली. तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. या दोन्ही शहरातील संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन दिवसात विशेष तपास पथकाची (स्पेशल इन्वेस्टीगेटींग टीम) स्थापना करण्यात येईल,असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

यासंदर्भात सदस्य संदीप क्षीरसागर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.यावेळी बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या घटनेचा वृतांत सांगितला. यावेळी त्यांनी ती घटना मराठा आंदोलकांनी केली नाही, अशी भूमिका आमदार संदीप क्षीरसागर घेतली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देखील क्षीरसागर यांनी भाष्य केलं.

आमदार संदीप क्षीरसागर

बीडमध्ये घडलेल्या हिंसाचारावर आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, बीडमध्ये घडलेली जाळपोळीची घटना दुर्दैवी आहे. हल्लेखोरांनी मंदिरसुद्धा फोडलं. माझ्या घरी जाळपोळ झाली. पंडितांच्या घरी दगडफेक केली, तिथून बस स्थानकातही दगडफेक केली आणि मग ते निवांतपणे निघून गेले. या घटनेचा मास्टरमाईंड कोण आहे, हे तापसणं गरजेचं आहे.

ते पुढे म्हणाले, छगन भुजबळ साहेबांनी घरी भेट दिली, आपले कौटुंबिक संबंध आहेत. परंतु एक आमदार म्हणून प्रामाणिकपणे सांगतो, या घटनेत मराठा समाजाच्या आंदोलनाचा कुठलाही संबंध नाही. इतर समाजाचाही संबंध नाही. ते गावगुंड होते, ते कुणाशी ना कुणाशी निगडीत होते, याचे कॉल रेकॉर्ड काढल्यास ते कुणाशी बोलत होते ते लक्षात येईल.

या सूचनेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, माजलगाव व बीड येथील घटनेप्रकरणी ज्यांच्याविरुद्ध सबळ पुरावा मिळालेला आहे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत २७८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी ३० आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावरती मोठे गुन्हे दाखल आहेत. अजूनही माजलगाव प्रकरणात ४० गुन्हेगार व बीड प्रकरणात ६१ गुन्हेगार फरार आहेत. त्यांच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपींचे मोबाईल लोकेशन, व्हाट्सॲप मेसेजेस तपासण्यात आले आहे. फरार आरोपी विरोधात देखील सबळ पुरावे पोलिसांकडे आहेत. हा हल्ला पूर्वनियोजित होता का?  याबाबतही चौकशी करण्यात येत आहे, हे सर्व प्रकरण शासनाने गांभीर्याने घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील हा प्रकार अत्यंत गंभीर होता. अशा घटनांना राजकारणापलीकडे जाऊन पाहिले पाहिजे. पोलिसांनी कारवाई केली नसती, तर ही घटना आणखी गंभीर झाली असती. जमाव जास्त व पोलिसांची कुमक कमी असल्यामुळे घटनेवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना कसरत करावी लागली. जमाव हा विखुरलेल्या स्वरूपात वेगवेगळ्या ठिकाणी होता. माजलगाव येथे आधी पोलीस कुमक गेली, त्यानंतर बीड शहरातील घटना सुरू झाली. या घटनेमध्ये चूक नसताना अटक झालेली असल्यास त्यांना बाहेर काढण्यात येईल. मात्र चूक असलेल्या कोणत्याही आरोपीला माफ केले जाणार नाही, असा इशाराही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिला.

या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य जयंत पाटील यांनी भाग घेतला.