शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी मिळाली मुदतवाढ

आता ‘या’ तारखेपर्यंत लागणार निकाल

नवी दिल्ली ,१५ डिसेंबर / प्रतिनिधी :-  शिवसेना व ठाकरे गट  यांच्यातील आमदार अपात्रतेच्या प्रकरणात सुरु असलेल्या सुनावणीच्या निकालाची वर्षभराहून अधिक काळ प्रतिक्षा आहे. त्यातच हा निकाल आता आणखी लांबणीवर गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर  यांच्याकडे हा निकाल लावण्याची जबाबदारी सोपवली आहे.

सुनावणीसाठी नार्वेकरांनी दोन वेळा वेळापत्रक जाहीर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ३१ डिसेंबर ही मुदत दिली होती. त्यामुळे या वर्षाच्या आतच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल अशी चिन्हे होती. मात्र, आता राहुल नार्वेकरांच्या विनंतीवरुन या निकालासाठी वेळ वाढवून देण्यात आला आहे.

१६ आमदारांच्या निलंबन प्रकरणाच्या निकालाचं लेखन करण्यासाठी राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे २१ दिवसांचा अधिक वेळ म्हणजेच २१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ करण्याची विनंती केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने २१ ऐवजी १० दिवस वाढवून दिले आहेत. त्यामुळे निकाल पुढच्या वर्षी ढकलला गेला आहे. निकाल लांबणीवर गेला असला तरीही तो संक्रांतीच्या आत लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कोणत्या गटावर संक्रांत येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

याप्रकरणी २० डिसेंबरपर्यंत संपूर्ण सुनावणी पूर्ण होणार आहे. त्यानंतर, हा निकाल राखून ठेवला जाईल. कारण, निकाल देण्यापूर्वी दोन्ही बाजुंचा दस्तावेज वाचून, अभ्यासून पाहावा लागणार आहे. त्यामुळे, निकालपत्र तयार करुन निकाल जाहीर करण्यासाठी वेळ लागणार आहे, अशी बाजू विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ३ आठवड्यांची मुदत वाढवून मागितली होती. मात्र, न्यायालयाने १० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे, आता शिवसेना आमदार अपात्रतेवर १० जानेवारी २०२४ किंवा तत्पूर्वी निकाल येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.