दाऊदच्या राईट हँडसोबत ठाकरेंच्या नेत्याची पार्टी? सुधाकर बडगुजर यांनी आरोप फेटाळले, एसआयटी चौकशीची फडणवीसांची घोषणा

नागपूर ,१५ डिसेंबर  /प्रतिनिधी :-१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीम याचा उजवा हात समजला जाणाऱ्या सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर पार्टी करीत होते असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला सलीम कुत्ता पॅरोलवर बाहेर असताना त्याने बडगुजर यांच्यासोबत पार्टी केल्याचा गंभीर आरोप राणेंनी यावेळी केला. त्यासोबत त्यांनी पार्टीचे फोटोही विधानसभेत दाखवले. मंत्री दादा भुसे, आशिष शेलार यांनीही या प्रकरणी प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा मुद्दा गंभीर असल्याचे म्हणत या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे. तर, आपल्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्टीकरण बडगुजर यांनी दिले आहे.

बडगुजरांचा गॉडफादर कोण?

नितेश राणे यांनी अधिवेशनादरम्यान एक फोटो दाखवत शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर ९३ साली बॉम्ब स्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीम याचा उजवा हात सलिम कुत्ता याच्याबरोबर पार्टी केल्याचा आरोप केला. आपल्याकडे याचा व्हिडिओ देखील असल्याचा दावा राणे यांनी यावेळी केला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. याबाबत, “१९९३ चा बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम चा हस्तक सलीम कुत्ता त्याच्या समवेत उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) नेता पार्ट्या करतो. देशद्रोही असलेल्या आणि पॅरोलवर जेलमधून बाहेर असलेल्या सलीम कुत्ता सोबत हितसंबंध ठेवतो. या लोकांचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे. त्याचा शोध घ्यावा. एसआयटी नेमून या प्रकरणातील प्रत्येकाची चौकशी व्हावी आणि देशद्रोह्यांवर कारवाई व्हावी, असेही राणेंनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले.

सुधाकर बडगुजर यांच्याकडून आरोपांचं खंडन-

व्हायरल व्हिडिओत मॉर्फिंग केले गेले आहे.हा सगळा बेबनाव असून योग्य माहिती न घेता माझ्यावर आरोप केले, असे स्पष्टीकर बडगुजर यांच्याकडून देण्यात आले. या प्रकरणी बोलताना बडगुजर म्हणाले, पालकमंत्री दादा भुसेंनी सभागृहात जे आरोप केले ते बिनबुडाचे आहेत. त्यांनी योग्य माहिती घेतली नाही. २०१६ मध्ये विजया राहटकर प्रकरणात वेगळ्या विदर्भाची मागणी झाली. शिवसैनिकांनी त्यासंदर्भात आंदोलन केले. त्यात शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले.माझ्यावरही झाला होता. मी देखील १५ दिवस सेंट्रल जेलमध्ये होतो.त्यावेळी सलीम कुत्ता जेलमध्ये असेल मला माहिती नाही. त्याची माझी सार्वजनीक जीवनात कुठे भेट झाली असेल ते देखील आठवत नाही. ते पुढे म्हणाले, राजकारणात आल्यापासून माझ्यावर एकही गुन्हा नाही. त्यानंतर जे गुन्हे दाखल झाले ते सगळे राजकीय हेतुने दाखल झाले. आता माझ्यासोबत सलिम कुत्ताचे नाव जोडले जात आहे. त्यांना ९२-९३ मध्ये अटक झाली. कैदी म्हणून २०२६ ला जेलमध्ये होतो. पालकमंत्र्यांवरच गुन्हा दाखल झाला पाहिजे. ड्रग्ज प्रकरणात ते आहेत. मी कधीच ठरवून कुत्ताला भेटलो नाही. तो जेलमध्ये असल्याचं मला माहिती नाही.

वरदहस्त कुणाचा याची चौकशी होणार – फडणवीस

नितेश राणे, नाशिकचे पालकमंत्री दादा भूसे यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर केलेल्या आरोपांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्ट केलं आहे. ते म्हणाले, “दाऊदच्या माणसासोबत नाशिकचा उबाठा गटाचा प्रमुख पार्टी करतानाचा, नाचताना फोटो, व्हिडिओ संदर्भात नितेश राणे, दादाजी भुसे, आशिष शेलार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची सखोल चौकशी करण्यात येईल. त्याला कुणाचा वरदहस्त आहे का, याचीही SIT माध्यमातून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल”, असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.