विधान परिषद प्रश्नोत्तरे :आरोग्य विभागाच्या परीक्षा प्रकरणी निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे

विधान परिषद प्रश्नोत्तरे :

मुंबई,२२ डिसेंबर /प्रतिनिधी:- आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड या पदासाठी झालेल्या कथित गैरव्यवहाराची निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करण्यात येईल, तसेच फेरपरीक्षा घेतल्यास उमेदवारांकडून कोणातेही परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षांसंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.टोपे म्हणाले, राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट व्हावी यासाठी आरोग्य विभागातील पदे शंभर टक्के भरली जावीत ही शासनाची भूमिका आहे. ही पदभरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येईल. त्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात येत आहेत. यात परीक्षापद्धतीत बदल करावा, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा, याबाबत सांगोपांग विचार करुन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.

परीक्षा घेण्यासाठी संस्था निश्चित करताना विहीत कार्यपद्धतीचा अवलंब केला गेला होता. सामान्य प्रशासनाच्या निकषांनुसार सर्व तपासणी करण्यात आली होती. संबधित संस्था काळ्या यादीत नसल्याचे आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले.

परीक्षासंदर्भात चौकशी सुरु असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई होईल. त्याचबरोबर उमेदवारांना परीक्षा शुल्क द्यावे लागणार नाही, त्यांच्यावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही असेही श्री टोपे यांनी यावेळी सांगितले. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या चर्चेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री गोपीचंद पडळकर, शशिकांत शिंदे, आदिंनी सहभाग घेतला.

गिरणी कामगारांसाठी मुंबईत प्राधान्याने घरे उपलब्ध

करुन देणार – गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड

गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासासाठी प्रयत्नशील आहे. ज्या गिरणी कामगारांनी 2016 च्या म्हाडा लॉटरीसाठी अर्ज केला होता व ज्यांनी या घरासाठी पैसे भरले होते, त्यांना ते पैसे व्याजासह परत करुन त्यांना प्राधान्याने मुंबईत घर उपलब्ध करुन दिले जाईल, असे गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

गिरणी कामगारांच्या घरांबाबत विधान परिषदेचे सदस्य भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड बोलत होते.

गृहनिर्माण मंत्री डॉ.आव्हाड म्हणाले, ज्या गिरणी कामगारांनी या घरासाठी पैसे भरले आहेत. त्यांना ते पैसे व्याजासाह परत केले जातील. मुंबईत म्हाडाची घरे ज्यावेळी उपलब्ध होतील. त्यावेळी त्यांना प्राधान्याने घरे उपलब्ध करुन दिली जातील.

गिरणी कामगारांसाठी म्हाडामध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करुन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगीतले .

सदस्य भाई गिरकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या वेळी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदस्य सर्वश्री प्रसाद लाड, शशिकांत शिंदे, कपील पाटील, विनायक मेटे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

अकोला विमानतळ धावपट्टीचे विस्तारीकरण होणार –सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

अकोला येथील विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्याच्या कामाबाबतचा प्रश्न लवकर सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली.

अकोला येथील विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचे काम प्रलंबित असल्याबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावरील चर्चेत सदस्य सर्वश्री डॉ.रणजित पाटील, शशिकांत शिंदे, विक्रम काळे व संजय दौंड यांनी सहभाग घेतला होता.

श्री.भरणे म्हणाले, मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अकोला विमानतळाच्या विकासाकरिता आढावा बैठक दि. ७ फेब्रुवारी २०२० रोजी घेण्यात आली. या बैठकीत अकोला  विमानतळाच्या विकासाबाबत व विस्तारीकरणाबाबत व्यवहार्यता अभ्यास अहवाल करण्यास सुचविले होते. तसेच या कामाबाबत वेळोवेळी सूचना आलेल्या आहेत. हे काम मार्गी लागण्यासाठी केंद्र शासनासोबत लवकरच बैठक घेतली जाईल अशी माहिती श्री.भरणे यांनी दिली.

ठाणे खाडी क्षेत्रात स्थानिक मच्छिमारांना परंपरागत मासेमारी

करण्याची मुभा मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

ठाणे खाडी क्षेत्रात स्थानिक मच्छिमारांना परंपरागत मासेमारी करण्याची मुभा आहे अशी माहिती वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली.

नवी मुंबईतील तलाव कांदळवन म्हणून घोषित केल्याने मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आल्याबाबत आमदार रमेशदादा पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. श्री.भरणे म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील ठाणे तालुक्यातील १४७१ हेक्टर कांदळवन क्षेत्र शासनाने राखीव वन म्हणून अधिसूचीत  केले आहे. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या व्यवस्थापन आराखड्यामध्ये खाडी क्षेत्रात स्थानिक मच्छिमारांना परंपरागत मासेमारी करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. स्थानिक मच्छिमारांच्या प्रश्नाबाबत बैठक घेवून त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याची माहिती श्री.भरणे यांनी यावेळी दिली.