उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करु शकतात : चंद्रकांत पाटील

… तर राष्ट्रपती राजवट स्वीकारून सगळाच कारभार केंद्राकडे द्या

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना आव्हान

देवेंद्र फडणवीसांनी कोणता सल्ला दिला?

मुंबई,२२ डिसेंबर /प्रतिनिधी:-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरुन भाजपने जोरदार टोलेबाजी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, त्यांनी चार्ज कुणाला तरी द्यावा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर त्यांचा विश्वास नाहीये, हे स्वाभाविक आहे. कारण चार्ज घेतला तर सोडणारच नाही. आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्यावा. राज्याला मुख्यमंत्री नाही, सभागृहाला मुख्यमंत्री नाही. सह्या करायला मुख्यमंत्री नाही ही स्थिती राज्याच्या हिताची नाही.

चंद्रकातं पाटील म्हणाले, रश्मी ठाकरे यांच्याकडे थेट चार्ज देता येणार नाही. आधी त्यांना मुख्यमंत्री करावं लागेल. ज्याने शपथ घेतली आहे अशाच व्यक्तीकडे चार्ज द्यावा लागतो. रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करायला काही हरकत नाही पण त्यासाठी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागेल. उद्धव ठाकरेंच्या मनात आलं तर रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करु शकतात असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लागावला आहे.

ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेवरून काँग्रेसचे नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या टीकेचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी समाचार घेतला. राज्यातील प्रत्येक प्रश्न केंद्र सरकारनेच सोडवायचा असेल तर महाविकास आघाडी सरकारने राजीनामा देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट स्वीकारावी, असे आव्हान त्यांनी अशोक चव्हाण यांना दिले.

            चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, ओबीसी राजकीय आरक्षण गमावण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकारची ढिलाई आणि बेपर्वाई कारणीभूत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणासाठी ट्रिपल टेस्ट पूर्ण करणे व त्यासाठी मुळात एंपिरिकल डेटा गोळा करण्यास सांगितले असताना त्यासाठी महाविकास आघाडीने अजूनही काही प्रभावी पावले टाकलेली नाहीत. मार्च २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही आघाडी सरकारने ओबीसींचा एंपिरिकल डेटा गोळा केला असता तर आतापर्यंत हा प्रश्न सुटला असता. पण आपण काहीही करायचे नाही आणि प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलायची असे आघाडी सरकारचे धोरण आहे.

            त्यांनी सांगितले की, कोरोना महासाथ, मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण अशा प्रत्येक महत्त्वाच्या विषयात आघाडी सरकार स्वतः काही जबाबदारी पार पाडायचे टाळून केवळ केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलत आहे. राज्यातील प्रश्न सोडविण्याची मुख्य जबाबदारी आघाडी सरकारची असताना त्यासाठी कोणताही पुढाकार घेताना आघाडी सरकार दिसत नाही. पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून मोदी सरकारने जनतेला दिलासा दिल्यानंतर आघाडी सरकार मात्र शक्य असून असा दिलासा देत नाही. केवळ केंद्र सरकारनेच कर कमी करून आणखी दिलासा द्यावा अशी अपेक्षा आघाडीचे नेते व्यक्त करतात. अशा रितीने राज्यातील प्रत्येक प्रश्न केंद्र सरकारनेच सोडवायची आघाडी सरकारची अपेक्षा असेल तर या सरकारला राज्यात सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. आघाडी सरकारने सत्ता सोडून राष्ट्रपती राजवट स्वीकारावी आणि मगच केंद्र सरकारकडून प्रत्येक कामाची अपेक्षा करावी.

देवेंद्र फडणवीसांनी कोणता सल्ला दिला?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरुन टीका करण्यात येत आहे. त्याबाबत पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला. तावर बोलताना ‘माननीय मुख्यमंत्र्यांची तब्येत खराब असेल आणि ते येत नाहीत म्हणून आक्षेप घेणं बरोबर नाही. तब्येत खराब असेल त्यामुळे ते आले नाहीत तरीही आम्ही अधिवेशन पार पाडू. आमचं म्हणणं एवढंच आहे की कामकाज व्हावं. आमचं सरकार असताना एखादा मंत्री आजारपणामुळे सभागृहात उपस्थित राहू शकला नाही तर आम्ही त्या खात्याची जबाबदारी दुसऱ्या मंत्र्याकडे दिली होती. मुख्यमंत्र्यांनी जबाबदाऱ्यांचं वाटप करावं’, असा सल्ला फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.