भाजपाला आमच्याशिवाय पर्याय नाही-खासदार गजानन कीर्तिकर  

मुंबई,१७  एप्रिल / प्रतिनिधी :-  सध्या महाराष्ट्रासह देशभरात अनेक निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत धूळ चारण्यासाठी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. तसेच, राज्यातही विरोधी पक्षांनी भाजप आणि शिंदे सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशामध्ये शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपबद्दल मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, “भाजप राज्यात कमकुवत आहे, असे मी म्हणणार नाही. पण, त्यांना सध्या शिंदे गटाशी युती करावीच लागणार आहे.” असे मोठे विधान त्यांनी केले आहे.

खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले की, “राष्ट्रीय स्तरावर सत्तेची सर्व सूत्र भाजपाकडे आहेत. मात्र, महाराष्ट्राचा विचार केला तर भाजपाला एकहाती सत्तेची सूत्र कधीच मिळाली नाहीत. तर पुढेही मिळण्याची शक्यताही नाही,” असा दावा त्यांनी केला आहे. “राज्यात २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला २२ आणि भाजपला २६ जागा असे वाटप झाले होते. तेव्हा आमचे १८ खासदार निवडून आले होते, तर ४ जणांचा पराभव झाला. तर भाजपचे २३ जण निवडून आले तर ३ जणांचा पराभव झाला. ही महाराष्ट्राची राजकीय स्थिती आहे. त्यांचे राष्ट्रीय स्तरावर ३५० खासदार निवडून येत असले तरीही राज्यातील स्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात भाजप कमकुवत आहे, असे माझे मत नाही. पण शिवसेनेपेक्षा भाजप मजबूत आहे, असेही नाही.” असे मत त्यांनी व्यक्त केले.