पत्राचाळ भ्रष्टाचारात शरद पवारांचा सहभाग!-चौकशी करण्याची भाजपची मागणी

खोटं बोल पण रेटून बोल ही भाजपची पध्दत-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे

​मुंबई ​,२० सप्टेंबर  /प्रतिनिधी :-एक हजार कोटींच्या पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात दाखल झालेल्या चार्जशीटमध्ये ईडीने पुराव्यानिशी हे दाखवून दिले असल्याचे भातखळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Image

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेऊन कालबद्ध मर्यादेत या संबंधांची चौकशी करावी, अशी मागणीही अतुल भातखळकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणामध्ये गुरुआशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे, यासाठी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात संजय राऊत यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री हे सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

अतुल भातखळकर म्हणाले, पत्राचाळ प्रकल्पाला परवानगी देण्यासाठी म्हाडा प्राधिकरण असले तरी म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्य शक्तींचा दबाव होता. त्यामुळे या चौकशीच्या प्रकरणाचे धागेद्वारे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपर्यंत, महाराष्ट्राचे जाणते राजे म्हटल्या जाणाऱ्या नेत्यापर्यंत जात आहेत. अतुल भातखळकर यांनी आपल्या आरोपांसंदर्भात तत्कालीन गृहनिर्माण सचिवांचे विश्लेषण करणारे पत्रही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे. या पत्रावरून म्हाडावर बाह्य शक्तीचा दबाव होता, हे स्पष्ट होत असल्याचे भातखळकर म्हणाले. तसेच, मराठी माणसाला न्याय देण्याकरता आणि त्यातील खरे सत्य बाहेर येण्याकरता या संदर्भात एक उच्चस्तरीय कालबद्ध मर्यादेत चौकशी करावी, अशी मागणी भातखळकरांनी केली आहे.

गोरेगावमध्ये गुरुआशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते. यातून शेकडो मुंबईकरांना स्वस्तात घरे उपलब्ध होणार होती. मात्र, संजय राऊत यांचे बंधू व गुरुआशिष कंपनीचे प्रवीण राऊत यांनी या जागेतील एफएसआय परस्पर बिल्डरांना विकल्याचे समोर आले आहे. यातून जवळपास एक हजार कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. तसेच, शिवसेना नेते संजय राऊतच या घोटाळ्याचे मास्टरमाईंड होते, असा आरोपही ईडीने चार्जशीटमध्ये केला असल्याचे भातखळकर यांनी या पत्रात म्हटले आहे.

खोटं बोल पण रेटून बोल ही भाजपची पध्दत-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे

पत्राचाळ प्रकरणात चौकशी सुरू आहे त्यात कुठेही ईडीने शरद पवार यांचे  नाव घेतले नाही परंतु खोटं बोल पण रेटून बोल ही भाजपची पध्दत आहे, असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे ते पचनी पडत नसल्याने भाजपच्या अतुल भातखळकर यांनी नवीन बातमी निर्माण केली आहे. मोठमोठ्या नेत्यांवर आरोप करायचे हीच भाजपची भूमिका राहिलेली आहे. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न होत नसून केवळ नेत्याची व पक्षाची बदनामी करण्याच्या हेतूने भाजपद्वारा असले प्रयत्न केले जात असतात. दुर्दैवाने आज बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या यांसारख्या विषयांकडे भाजपचे लक्ष नाही. त्यामुळे, फक्त सनसनाटी निर्माण करण्याच्या प्रयत्नांतून भातखळकर यांनी हे ट्वीट केलेले आहे हे स्पष्ट आहे.

ईडीच्या आरोपपत्रात एका बैठकीला शरद पवारही उपस्थित असल्याचा उल्लेख

२००६-०७ या काळात गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणी ज्या बैठका झाल्या, त्यात म्हाडाचे काही अधिकारी तत्कालीन मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हेदेखील उपस्थित होते, असे स्पष्टपणे ईडीने आरोप पत्रात नमूद केले आहे. तसेच पत्राचाळ घोटाळ्यात प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे फ्रंट मॅन म्हणून काम करत होते. मात्र संपूर्ण घोटाळ्याचे सूत्रधार संजय राऊत असल्याचे ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे.
 
२००६-०७ च्या दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार होते. तसंच २००७ मध्ये विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. या दोघांचीही नावे ईडीच्या चार्जशीटमध्ये आहेत. तसेच, शरद पवार यांच्याशी बैठक झाल्यानंतरच वाधवान हे या सगळ्यामध्ये कसे आले हे समोर आले आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. ईडीने आपल्या आरोपपत्रात खुलासा केला आहे की, पत्राचाळ प्रकरणात राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांनी संगनमताने मनी लाँड्रिंग केली आहे.

प्रवीण राऊत यांच्याकडे महत्त्वाचे अधिकार दिले गेले
 प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याने ते कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करू शकत होते तसे अधिकार त्यांना देण्यात आले होते. म्हाडासोबत वाटाघाटी करण्याचे आणि सर्व सरकारी, निमशासकीय आणि स्थानिक प्राधिकरणांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्याची जबाबदारी प्रवीण राऊत यांच्यावर देण्यात आली होती. संजय राऊत यांच्याशी जवळीक असल्याने प्रवीण राऊत यांनी म्हाडामध्ये काम करणाऱ्या बहुतांस सरकारी अधिकाऱ्यांशी विविध फायदे आणि लाभ मिळवण्याच्या हेतूने संपर्क साधला. त्यानंतर एफएसआय बिल्डरला विकला.
प्रवीण राऊत, संजय राऊत आणि राकेश वाधवान यांच्यात संगनमत
प्रवीण राऊत, संजय राऊत आणि राकेश वाधवान यांच्यात संगनतमत होतं असंही ईडीने त्यांच्या आरोपपत्रात म्हटलं होतं. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प ७४० कोटींचा असून त्यात प्रवीण राऊत यांना १८० कोटी मिळाले आहेत असे प्रवीण राऊत यांनी त्यांच्या जबाबात म्हटले आहे. याचा आधार घेत संजय राऊत यांना या गुन्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पैसे मिळाले असाही अंदाज ईडीने व्यक्त केला आहे.