कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा दिला इशारा; बेळगावात येण्याचे धाडस केलात तर…

बंगळुरु, ५ डिसेंबर /प्रतिनिधी :-महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावादामध्ये दोन्ही राज्यात दररोज हालचाली घडताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची वक्तव्ये ही महाराष्ट्राच्या जखमीवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत. ‘महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, असे आमच्या सचिवांमार्फत महाराष्ट्राच्या सचिवांना लेखी कळवण्यात आलेले आहे. पण, तरीही बेळगावात येण्याचे धाडस केल्यास कायदेशीर कारवाई करू, असा इशारा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, “महाराष्ट्राचे मंत्री बेळगावमध्ये आल्यास सध्याच्या परिस्थितीमध्ये बदल होईल. तसेच, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यांचे बेळगावमध्ये येणे योग्य नसल्याचे आधीच स्पष्ट केलेले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील नागरिकांमध्ये एकोपा तर आहेच पण सध्या सीमावाद देखील आहेत. कर्नाटकच्या मते सीमा वाद हा एक संपलेला विषय आहे. मात्र महाराष्ट्र वारंवार सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. अशामध्ये महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी राज्यात येण्याचे धाडस केले तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.” कर्नाटकातील बेळगावमध्ये सीमावाद वाढला आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी मंगळवारी सीमावर्ती शहराला भेट देण्याची घोषणा केली. दुसरीकडे कन्नड संघटनांनी कामगारांना बेळगावी येऊन राज्यात प्रवेश रोखण्याचे आवाहन केले.