विरगावचे सहायक पोलिस निरीक्षक नरवडे यांची वैजापूरला तडकाफडकी बदली ; रोडगे यांनी पदभार स्वीकारला

वाळूची हेराफेरी ठरली कारणीभूत ; ठाण्याच्या हद्दीत बोकाळले होते अवैध धंदे
वैजापूर ,७ जुलै  /प्रतिनिधी :-पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू तस्करीबरोबरच दारू व वाढत्या चोऱ्यांचे सत्र पाहता पोलिस अधीक्षकांनी ( ग्रामीण ) अखेर वीरगाव पोलिस ठाणेप्रमुखांची तडकाफडकी उचलबांगडी केली आहे. त्यांना वैजापूर पोलिस ठाण्यात रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.

अवैधधंद्यांना दिलेली मोकळीक,  नागरिकांशी केलेला उर्मटपणा व तक्रारी त्यांना चांगल्याच अंगलट आल्या. विशेषतः वाळूची हेराफेरी प्रकरण त्यांच्या चांगलेच अंगलट आल्याने पोलिस अधीक्षकांनी त्यांची चौकशी सुरू केली आहे.पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील काही ठाण्यांमध्ये अधिकाऱ्यांची उचलबांगडी करून खांदेपालट केली आहे. यामध्ये तालुक्यातील वीरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय नरवडे यांचीही गच्छंती झाली. गेल्या काही दिवसांपासून वीरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाळूमाफियांनी घातलेला धुडगूस, अवैध दारू विक्री, जोमाने सुरू असलेला मटका आदी अवैधधंदे बिनबोभाटपणे सुरू होते.  याशिवाय दरोडे व  चोऱ्याही वाढल्या होत्या. ठाण्याच्या हद्दीत बेबंदशाही सुरू असल्यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. दंडेलशाहीच्या पाठबळामुळे सामान्य नागरिक तक्रार करायला धजावत नसत. ठाणेप्रमुखांच्या महाभारतातील ‘धृतराष्ट्राच्या’ भूमिकेमुळे गुन्हेगारांवर वचक राहिला नव्हता. बेफामपणे सुरू असलेले अवैधधंदे रोखण्यास आलेले अपयश, नागरिकांच्या वाढत्या तक्रारीचा ओघ लक्षात घेता असे अकार्यक्षम अधिकारी पोलिस अधीक्षकांच्या रडारवर होते. अधीक्षकांच्या जाळ्यात नरवडे अलगद अडकले गेले अन् ते त्यांचे सावज ठरले. परिणामी नरवडेंची अल्पावधीतच ठाण्यातून उचलबांगडी करण्यात आली व ठाणेप्रमुखांचा पदभार सोडून वैजापूर पोलिस ठाणेप्रमुखांच्या हाताखाली काम करण्याची  नामुष्की पत्करावी लागली.

वीरगावचे  नवे ठाणेप्रमुख म्हणून शरदचंद्र रोडगे यांनी सूत्रे हाती  घेतली आहे. विशेष म्हणजे मुदतीपूर्वीच नरवडेंना हटविण्यात आले. त्यांच्या दंडेलशाहीला नागरिक वैतागले होते. त्यामुळे  त्यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली होती. एवढेच नव्हे तर वीरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खंडाळा येथील एका नवविवाहित तरुणाचा सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने खून केला होता. या प्रकरणातही  ठाणेप्रमुखांनी कुटुंबातील सदस्यांशी उर्मटपणाची भाषा वापरून अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गृहमंत्री व पोलिस अधीक्षकांकडे त्यांची तक्रार केली होती. याशिवाय साधारणतः दीड महिन्यांपूर्वी पोलिस ठाण्यातील वाहनातील वाळूचे हेराफेरी प्रकरण उघडकीस आल्यामुळे ठाणेप्रमुख नरवडेंसह अन्य तीन कर्मचाऱ्यांची पोलिस अधीक्षकांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या हेराफेरीच्या प्रकरणात नरवडेंना पोलिस उपअधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात चौकशी होऊन नरवडेंवर काय ठपका ठेवण्यात येतो ? हे गुलदस्त्यात असले तरी मात्र कारवाईच्या धास्तीने ठाणेप्रमुखांसह अन्य कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.  
वाळूमाफियांचा धुडगूस रोखणार का? 
दरम्यान वीरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाळूमाफियांनी घातलेला धुडगूस, फोफावलेल्या अवैधधंद्यांना लगाम घालणे, नूतन ठाणेप्रमुखांसमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे नूतन ठाणेप्रमुख या धंद्यांना आवर घालण्यास यशस्वी होतात की, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न होतात ? हे पाहणे मात्र औत्सुक्याचे ठरणार आहे.

विरगाव पोलिस ठाणे प्रमुखपदी रोडगे यांची नियुक्ती

विरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय नरवडे यांची वैजापूर येथे बदली झाली असून त्यांच्याजागी सहायक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शरदचंद्र रोडगे  हे 2012 बॅचचे पोलिस उपनिरीक्षक आहे असून सहायक पोलिस निरीक्षकपदी 1019 मध्ये त्यांची बढती झाली. रोकडे यांनी गडचिरोली, करमाड, सोयगाव, तुळजापुर व चिकलठाणा या ठिकाणी सेवा बजावली आहे. विरगाव पोलिस ठाण्याचा त्यांनी पदभार नुकताच सांभाळला असून पोलिस कर्मचारी व ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.