मोदी सरकार तातडीने दिल्ली सरकारला 500 रुपांतरीत रेल्वेचे कोच पुरविणार

रुग्णांसाठी 8,000 अधिक खाटा उपलब्ध

नवी दिल्ली, 14 जून 2020

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी आणि देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या या बैठकीत, कोरोना संसर्गापासून दिल्लीच्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले गेले.

शहा यांनी सांगितले की, दिल्लीतील रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी खाटांची कमतरता पाहता, केंद्र सरकारने, दिल्ली सरकारला तातडीने 500 रुपांतरीत रेल्वे कोच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, आता दिल्लीमध्ये 8,000 अधिक खाटा उपलब्ध होतील आणि कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी सर्व सुविधांनी सुसज्ज असतील.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, दिल्लीतील प्रतिबंधित क्षेत्रात रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना (कॉन्टॅक्ट मॅपिंग) ओळखण्यासाठी घरोघरी जाऊन व्यापक आरोग्य सर्वेक्षण केले जाईल आणि सर्वेक्षण अहवाल एका आठवड्यात उपलब्ध होईल. प्रभावी निरीक्षणासाठी प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केला जाईल.

Image

Image
Image
Image

गृहमंत्र्यांनी सांगितले की दिल्लीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड-19 ची चाचणी येत्या दोन दिवसांत दुप्पट करण्यात येईल व सहा दिवसांनंतर तिप्पट होईल. त्याशिवाय प्रतिबंधित क्षेत्रामध्ये (कंटेनमेंट झोन) प्रत्येक मतदान केंद्रात चाचणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

दिल्लीतील छोट्या रुग्णालयांपर्यंत कोरोना विषाणू संदर्भातील मार्गदर्शक तत्वे आणि माहितीचा प्रसार परिणामकारकरित्या करण्यासाठी मोदी सरकारने एम्स येथे दुरध्वनीवरून मार्गदर्शन करण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून कोरोना विरुद्धची सर्वोत्तम कार्यपद्धती शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचेल. दुरध्वनीवरून मार्गदर्शन करण्यासाठीचा हेल्पलाईन क्रमांक उद्या जाहीर केला जाईल.

शाह म्हणाले की, दिल्लीच्या खासगी रुग्णालयात कोरोना संसर्गाच्या उपचारांसाठी निश्चित कोरोना खाटांपैकी 60 टक्के खाटा कमी दारात उपलब्ध करून देणे, कोरोना उपचार आणि कोरोना तपासणीसाठी दर निश्चित करणे यासाठी नीती आयोगाचे  सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून, उद्या ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.

देश ज्या जोमाने आणि संपूर्ण ताकदीने कोरोना साथीच्या आजाराविरुद्ध लढा देत आहे ते गृहमंत्र्यांनी अधोरेखित केले आणि ज्या कुटुंबीयांनी या संसर्गामुळे आपल्या आप्तस्वकीयांना गमावले आहे त्याबद्दल दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, अंतिम संस्कारांबाबत सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे प्रतीक्षा करण्याचा वेळ कमी होईल.

अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली  सावधगिरीने व सर्वांच्या सहकार्याने देश या जागतिक उद्रेका विरुद्ध लढत आहे. या संकटाच्या वेळी अनेक स्वयंसेवी संस्था उत्कृष्ट कार्य करत आहे, यासाठी संपूर्ण देश त्याचा ऋणी राहील. याच प्रयत्नांमध्ये,सरकारने स्काउट्स आणि गाईड, एनसीसी, एनएसएस आणि इतर स्वयंसेवी संस्थांना आरोग्य सेवेमध्ये स्वयंसेवक म्हणून नोंदणी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूंविरूद्ध प्रभावीपणे लढा देण्यासाठी केंद्र सरकारने आणखी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिल्ली सरकारमध्ये नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजच्या बैठकीत इतर अनेक निर्णय घेतले गेले. भारत सरकार आणि दिल्ली सरकार, एम्स आणि दिल्लीच्या तिन्ही महानगरपालिका यांच्या आरोग्य विभागांच्या डॉक्टरांची संयुक्त टीम दिल्लीतील सर्व कोरोना रुग्णालयांना भेट देईल आणि कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य पायाभूत सुविधांची आणि तयारीची तपासणी करून अहवाल सादर करेल.

शाह यांनी केंद्र आणि दिल्ली सरकारच्या आरोग्य विभाग, सर्व संबंधित विभाग आणि तज्ञांना आजच्या बैठकीत घेतलेल्या सर्व निर्णयांची निम्न पातळीवर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर, नाडी ऑक्सिमीटरसह सर्व आवश्यक साधने पुरविण्याचे आश्वासन भारत सरकारने दिल्ली सरकारला दिले आहे.या बैठकीला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन, दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व एम्सचे संचालक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *