वैजापूर बाजार समितीच्या सभापती-उपसभापतीची २२ मे रोजी निवड

सभापतीपदी कल्याण जगताप यांची वर्णी लागणार 

वैजापूर ,११ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती यांची निवड करण्यासाठी २२ मे रोजी दुपारी बारा वाजता विशेष सभा घेण्यात येणार आहे. या सभेत सभापती व उपसभापती या दोन्ही पदांसाठी एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास मतदान घेण्यात येईल अशी माहिती सहायक निबंधक विनय धोटे यांनी दिली.

दरम्यान २८ एप्रिल रोजी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अठरा जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत शिंदे गटाचे विद्यमान आमदार रमेश पाटील बोरनारे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी व आप्पासाहेब पाटील यांच्या अधिपत्याखालील बळीराजा विकास पॅनलने अठरापैकी अकरा जागांवर विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले होते. तर महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलला सात जागांवर मिळाल्या असून या पॅनलकडून मातब्बर मंडळी निवडून आलेली आहे.

बहुमत असल्याने सभापती व उपसभापती या दोन्ही जागांवर आ. बोरणारे यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा विकास पॅनलचा दावा असणार आहे. सभापती व उपसभापती पदांची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही पदांसाठी अनेक नावे चर्चेत असून सभापतीपदी रामहरीबापू जाधव, कल्याण जगताप व काकासाहेब पाटील या तिघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बळीराजा विकास पॅनलकडुन रामहरी जाधव, कल्याण जगताप, गणेश इंगळे यांच्यासह काकासाहेब पाटील, कल्याण दांगोडे, शिवकन्या पवार, बाबासाहेब गायकवाड आदी उमेदवार विजयी ठरले होते.