अल्पवयीन मुलीला पळवून लग्न:आरोपी तरुणाला १० वर्षे तर तरुणाच्‍या माता-पित्‍याला तीन महिन्‍यांची सक्तमजुरी

तिघा आरोपींना विविध कलमांखाली एकूण ४२ हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा

औरंगाबाद ,५ जुलै  /प्रतिनिधी :-अल्पवयीन मुलीला पळवून नेल्यानंतर तिचे लग्न स्वत:च्या मुलासोबत लावल्याप्रकरणात आरोपी तरुणाला १० वर्षे सक्तमजुरी तर अल्‍पवयीन मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी तरुणाच्‍या माता-पित्‍याला तीन महिन्‍यांची सक्तमजुरी आणि तिघा आरोपींना विविध कलमांखाली एकूण ४२ हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्‍यायाधीश के.आर. चौधरी यांनी मंगळवारी(५ जुलै) ठोठावली. विशेष म्हणजे खटल्याच्‍या सुनावणीवेळी पीडिता ही फितुर झाली असताना देखील वैद्य‍किय पुरावा, लग्न लावणारा काजी आणि पीडितेच्‍या वडीलांची साक्ष ग्राह्यधरुन न्‍यायालयाने शिक्षा ठोठावली.

जुबेर शेख नईम शेख (२२) असे पीडितेशी लग्न करणाऱ्या  तरुणाचे तर शेख नईम शेख मुसा (४९) व शेख जरिना शेख नईम (४५, सर्व रा. चिकलठाणा परिसर) असे आरोपी तरुणाच्‍या माता-पित्‍याचे नाव आहे.

प्रकरणात १६ वर्षीय पीडित मुलीच्‍या वडिलांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, पीडितेचे वडील आरटीओ कार्यालयात एजंट आहेत. २० फेब्रुवारी २०२० रोजी फिर्यादी नेहमी प्रमाणे आरटीओत गेले होते. तर त्यांची पत्नी बचत गटाचा हप्ता भरण्यासाठी बाहेर गेली होती. दुपारी चार वाजता पीडिता घर व परिसरात कोठे दिसत नसल्याची माहिती पिडितेच्या आईने फिर्यादीला दिली. त्यानंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्‍ह्याचा तपास सुरु असताना २३ फेब्रुवारी २०२० रोजी पीडिता व जुबेर हे दोघे पोलिस ठाण्यात आले. पोलिसांनी जुबेरला अटक केली. पोलिस कोठडी दरम्यान जुबेरने पिडितेचे बनावट आधारकार्ड तयार करुन त्याआधारे २१ फेब्रुवारी जमिल अहमद काझी यांच्या कार्यालयात जाउन बेकायदेशीर लग्न केल्याची कबुली दिली. त्यानुसार, जमिल काझी यांच्याकडे चौकशी केली असता आरोपी जुबेरचे लग्न त्याचे वडील शेख नईम व आई शेख जरिना यांनी लावल्याचे त्‍यांनी सांगितले. तपासाअंती आरोपींविरोधात पोक्सोसह बालविवाह प्रतिबंधक कायद्यानूसार गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

गुन्‍ह्याचा तपास करुन तत्कालीन उपनिरीक्षक एम.बी. लाड यांनी दोषारोपपत्र न्‍यायालयात दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता ज्ञानेश्र्वरी नागुला/डोली यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदवले. विशेष म्हणजे पीडिता फितुर झाली. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने तिघा आरोपींना दोषी ठरविले. आरोपी जुबेर शेख याला भादंवी कलम ३६३ अन्‍वये तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, कलम ३६६ (अ) अन्‍वये पाच वर्षे सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंड, कलम ३७६ (२) अन्‍वये दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड, पोक्सोच्‍या कलम ४ (१) अन्‍वये दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड तर बाल विवाह प्रतिबंधक कायद्याच्‍या कलम ९ अन्‍वये आरोपीच्‍या माता-पित्‍याला तीन महिने सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.