वीजबिल वेळेवर भरा-आ.अब्दुल सत्तार यांचे आवाहन

औरंगाबाद,२८ जुलै /प्रतिनिधी :-गावोगावी झालेल्या विद्युतीकरणामुळे लोकांचे आयुष्य उजळले आहे. विजेमुळे विकासाला चालना मिळाली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपली वीजबिले वेळेवर भरायलाच हवीत, असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले.     

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २७ जुलै रोजी (बुधवारी) भराडी (ता.सिल्लोड) येथे आयोजित ‘उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य – पॉवर@२०४७’ कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आ.सत्तार बोलत होते. ते म्हणाले की, महावितरणचे अभियंता-कर्मचारी ग्राहकांना उत्कृष्ट विद्युतसेवा देण्यासाठी चांगले काम करत आहेत. मात्र ही कंपनी टिकवायची असेल तर नागरिकांनी आपली वीजबिले वेळेवर भरली पाहिजेत. त्यातूनच नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी महावितरणला बळ मिळेल. कुणीही विजेचा अनधिकृत वापर न करता अधिकृत वीजजोडणी घेऊनच वीज वापर करावा. तसेच विद्युत अपघात टाळण्यासाठी सर्वांनीच दक्षता घ्यायला हवी, असेही आ.सत्तार म्हणाले. प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही ग्राहकांना वीजबिले भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

महावितरणला विद्युत यंत्रणा उभारणीसह देखभाल-दुरुस्तीसाठी पैसा लागतो. ग्राहकांनी भरलेल्या बिलातूनच हा खर्च करणे व अधिक सुरळीत वीजपुरवठा करणे शक्य होते. कृषी ऊर्जा धोरणात शेतकऱ्यांनी भरलेल्या वीजबिलाची रक्कम कृषी आकस्मिक निधीत जमा करून संबंधित ग्रामपंचायत व जिल्हा स्तरावर विद्युत विकासाची कामे केली जात आहेत. शेतकऱ्यांचा पैसा शेतकऱ्यांसाठीच वापरला जात आहे. या अभिनव योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.     यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, पंचायत समितीचे उपसभापती राकडे, सरपंच पप्पू जगनाडे उपस्थित होते. याप्रसंगी महावितरणच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

ऊर्जा विभागाने केलेल्या उत्कृष्ट कामांची माहिती पोस्टर्स व चित्रफितीच्या माध्यमातून देण्यात आली. श्रावण कोळनूरकर, शिवाजी नरवडे, रमेश शिंदे, सुनील बनसोड, अभय एरंडे, अश्विनी पोतलवाड, प्रज्ञा दिवेकर, मधुकर कोळनूरकर यांनी वीजचोरीचे धोके, ऊर्जा बचत, महावितरणच्या ऑनलाईन सेवा व वीजबिल भरण्याचे महत्त्व या विषयांवर पथनाट्य सादर केले. केतकी पखाले यांच्या शिष्यांनी भरतनाट्यम सादर केले.   

कार्यक्रमास पॉवर फायनान्स कार्पोरेशनचे मुख्य महाव्यवस्थापक के.बी. सुब्रमण्यम, महापारेषणचे अधीक्षक अभियंता कांबळे, महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलाचे कार्यकारी अभियंता दीपक सोनोने, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) विजय पचारे, सिल्लोड विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश जाधव उपस्थित होते. प्रास्ताविक अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली तर सूत्रसंचालन मेघा देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिल्लोड विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विश्वनाथ लहाने, उपकार्यकारी अभियंता सचिन बनसोडे, राजेंद्र हेकडे, सहायक अभियंता अनिल सैवर, अमोल औटे यांच्यासह महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, वीजग्राहक मोठ्या संख्येत उपस्थित होते.