पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई ,४ जुलै /प्रतिनिधी :- शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय राज्य सरकारने  केला  असून राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय  घेण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावानंतर अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषणाच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी  देण्यात  येणार आहे. या निधीतून हिरकणी गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल.  केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी इंधनावरील कपात केली त्याच धर्तीवर राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय  घेण्यात येणार आहे.

आगामी कालावधीत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून साकारत असलेल्या समृद्धी महामार्गातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन राज्याच्या विकासाला चालना मिळेल. मुंबईतील मेट्रो प्रकल्पाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. मेट्रो प्रकल्प गतीने पूर्ण करण्याकडे राज्य शासनाचे प्राधान्य असेल. राज्यातील सर्व प्रलंबित प्रकल्पांच्या कामांना गती देणार आहेत. तसेच शासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे एकांगी निर्णय न घेता सर्वांच्या हितासाठी शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिली.

राज्य शासन सर्वांना बरोबर घेऊन सर्वधर्मीयांना समन्यायाने वागणूक देणार असून सर्वांच्या विकासासाठी हे शासन काम करेल. राज्यातील सर्व प्रलंबित प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचा सच्चा सैनिक म्हणून मी काम करणार आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी तात्काळ निर्णय घेऊन सर्वसामान्यांची कामे लवकर होण्यासाठी आमचे सरकार भर देणार असून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहोत.

सर्वसामान्य, वंचित, पीडित सर्व घटकांना न्याय देण्याचे काम सरकार करेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

सर्वसामान्य, वंचित, पीडित सर्व घटकांना न्याय देण्याचे काम सरकार करेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे शहरात जोरदार स्वागत

ठाणे: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज  ठाणे शहरात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांसह वरूणराजानेही जोरदार हजेरी लावली. ठाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनंदनगर चेक नाका येथे जोरदार स्वागतानंतर मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे शक्तीस्थळ आणि टेंभी नाक्यावरील आनंद आश्रम येथे भेट देऊन आनंद दिघे यांना आदरांजली अर्पण केली. सर्वसामान्य, शोषित, वंचित, पीडित अशा सर्व घटकांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार करेल. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी शक्तीस्थळाला भेट दिल्यानंतर दिली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे आमदारांसमवेत रात्री सव्वा नऊच्या सुमारास आनंद नगर चेक नाक्यावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या वाहनावर पुष्पवृष्टी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी केलेल्या जोरदार स्वागतानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळावर दाखल झाले. आनंद दिघे यांच्या समाधीचं दर्शन घेत त्यांनी अभिवादन केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. कोकण विभाग परिक्षेत्राचे महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

सर्वसामान्य घटकांचा, शोषित,वंचित, पीडित अशा सर्व घटकांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार करेल. शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आमचं सरकार करेल, राज्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

ठाण्याच्या आनंद आश्रमातील स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले दर्शन

ठाण्याच्या आनंद आश्रमातील स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले दर्शन

भर पावसात मुख्यमंत्र्यांनी साधला नागरिकांशी संवाद

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज रात्री ठाण्यातील आनंद आश्रम येथे सहकारी आमदारांसह भेट दिली. यावेळी त्यांनी व उपस्थित आमदारांनी धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. स्व. दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे भावूक झाले होते.

रात्री दहाच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे यांचे बसमधून इतर आमदारांसह टेंभी नाका येथील आनंद आश्रम येथे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने महिला व पुरुष भर पावसात उभे होते. ढोलताशाच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. आनंद आश्रमात पाऊल ठेवताच उपस्थित महिलांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी माजी कृषिमंत्री आमदार दादाजी भुसे, आमदार संजय राठोड, आमदार यामिनी जाधव यांच्यासह इतर सहकारी आमदार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.

आनंद आश्रमातील भेटीनंतर बाहेर उभ्या असलेल्या नागरिकांनी मुख्यमंत्री महोदयांनी भर पावसात भेट घेतली. तसेच येथे उभारलेल्या स्टेजवरून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनीही मुख्यमंत्री महोदयांचे जल्लोषात स्वागत केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार सर्वश्री दादाजी भुसे, संदिपान भुमरे, संजय राठोड, भरत गोगावले, दीपक केसरकर, संजय शिरसाट यांच्यासह इतर मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या  शिवाजी पार्क येथील स्मृती स्थळाला भेट देऊन त्यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.