जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता का नाही..? -पेन्शनर्स संघटना

वैजापूर ,५ जुलै  /प्रतिनिधी :- नुकतेच राज्यातील सरकारी व खाजगी शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांना जूनचे निवृत्ती वेतन व त्यासोबत सातव्या वेतन आयोगाचा शासनाकडे थकीत तिसरा हप्ता देण्यात आला, मात्र जिल्हा परिषदच्या सेवानिवृत्त शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता न देता फक्त जून चे निवृत्ती वेतनच देण्यात आले.

शासनाचे स्पष्ट आदेश होते की, जून महिन्याच्या निवृत्ती वेतनसोबत सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता ही द्यावा असे असताना जिल्हा परिषद औरंगाबाद ने हा हप्ता का थांबविला ?असा प्रश्न वैजापूर पेन्शनर्स संघटनेतर्फे उपस्थित करण्यात आला असून संघटनेचे अध्यक्ष धोंडीरामसिंह राजपूत यांनी तात्काळ हा तिसरा हप्ता देण्याची मागणी वैजापूर येथे मंगळवारी झालेल्या पेन्शनर्स मेळाव्यात केली.
 जिल्हाधिकारी यांनी याबाबत लक्ष घालून थकीत हप्ता देण्याचे आदेश त्वरित द्यावेत व जिल्हा परिषदच्या सेवानिवृत्त शिक्षकाना दर महिन्याच्या पाच तारखेपूर्वी निवृत्ती वेतन मिळावे अशीही मागणी राजपूत यांनी या मेळाव्यात केली. संघटनेचे कार्याध्यक्ष पी.डी. शेटे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.याप्रसंगी राष्ट्रीय नारायणी सेनेचे अध्यक्ष अशोक पवार तसेच पेंशनर्स संघटनेचे सचिव उत्तम साळुंके,कोषाध्यक्ष अण्णासाहेब शेळके, साहेबराव साळुंके, जाधव, लक्ष्मण निकम, उगले, डघळे, बत्तीसे यांच्यासह पेंशनर्स उपस्थित होते.शेवटी अशोक पवार यांनी आभार मानले.