ब्रम्हगव्हाण जलसिंचन योजना त्वरित कार्यान्वयीत कराः सुभाष देसाई

मुंबई, दि. २५
आमदार अंबादास दानवे यांच्या विनंतीवरून औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तसेच गंगापूर तालुक्यासाठी महत्वाकांक्षी ठरणारा ब्रम्हगव्हाण जलसिंचन योजना त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आज दिल्या.
 श्री. देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात आज ब्रम्हगव्हाण जलसिंचन योजनेच्या पूर्ततेचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार आंबादास दानवे, आमदार रमेश बोरनारे तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पैठण तसेच गंगापूर तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी २०१० साली ब्रम्हगव्हाण जलसिंचन योजना मंजूर करण्यात आली. मात्र, अद्याप ही योजना कार्यान्वयीत होऊ शकली नाही. याबाबत पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक घेण्यात आली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या योजनेतील त्रुटी दूर करून ही योजना तात्काळ कार्यान्वयीत करण्याच्या सूचना केल्या.
 पर्यावरण तसेच वन विभागाच्या परवानग्या ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करता येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ही योजना पूर्ण झाल्यास पैठण तसेच गंगापूर तालुक्यातील २५ गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असे आमदार दानवे यांनी स्पष्ट केले.