तरुणाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दाखल फौजदारी याचिकेमध्ये पोलिसांना नोटीस

औरंगाबाद ,१९ जून /प्रतिनिधी :-हिंगोली येथील तरुणाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दाखल फौजदारी याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. सारंग कोतवाल आणि न्या. भारत देशपांडे यांनी प्रतिवादी राज्याचे गृहसचिव, विशेष पोलिस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र, पोलिस अधिक्षक हिंगोली यांना नोटीस देत याचिकेतील आरोपांविषयी जबाब दाखल करण्याचे आदेश दिले आहे.

हिंगोली येथील मस्तानशाहनगरचे रहिवासी इस्माइल खान यांनी खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार याचिकाकर्त्याचा विवाहित मुलगा इरफान खान यास ३० सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्याच भागातील चार तरुण पार्टीसाठी घेऊन गेले. मात्र इरफान घरी परतला नसल्यामुळे एक ऑक्टोबर रोजी याचिकार्त्यांनी पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी हिंगोलीपासून २० किमी अंतरावर सोडेगाव भागात कयाधु नदीमध्ये इरफानचा अर्धनग्न मृतदेह जखमांसह जळालेल्या अवस्थेत आढळला होता. तेव्हापासून याचिकाकर्त्याने पोलिसांना तोंडी आणि लेखी तक्रार करून मृताच्या साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची विनंती करीत आहेत. मात्र आरोपींना वाचविण्यासाठी पोलिस गुन्हे दाखल करीत नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी सुनावणीत खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावत सहाय्यक सरकारी वकीलांना याचिकेतील आरोपांविषयी खुलासा करण्यासाठी जबाब दाखल करण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. सईद शेख आणि शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील एस. डी. घायाळ यांनी बाजू मांडली.