पदवीधर निवडणूकीत राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे पालन करावे -सुनिल केंद्रेकर

औरंगाबाद, दि. 3 – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहिर झाली असून त्या अनुषंगाने राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरेपणे पालन करावे तसेच उमेदवारांनी परिपूर्ण उमेदवारी अर्ज सादर करावा अशा सूचना विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी केल्या.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदासंघाच्यानिवडणूकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीची बैठक आज घेण्यात आली त्यावेळी श्री. केंद्रेकर बोलत होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण, उपायुक्त पांडूरंग कुलकर्णी, उपायुक्त शिवाजी शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती.

उमेदवारी अर्ज दाखल करतांना उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज भरणे बंधनकारक असून छोट्या-छोट्या चुका होणार नाही याकरिता दक्ष राहावे असे सांगून श्री.केंद्रेकर म्हणाले की, अर्ज सादर करताना उमेदवारांनी आपल्यासोबत केवळ दोनच व्यक्तींना व दोनच वाहनांना परवानगी असेल. या सर्व प्रक्रियेचे चित्रीकरण होणार आहे. दरम्यान कोविडच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून निर्धारित करण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन उमेदवारांना करण्यासंदर्भात यावेळी सविस्तर मागदर्शन करण्यात आले