कोवीडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची क्षमता बांधणी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

औरंगाबाद,२५जून /प्रतिनिधी :- जिल्ह्यात  कोवीड संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत सर्व यत्रंणा समन्वयपूर्वक चांगले काम करत असून याच पध्दतीने संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी प्रशिक्षित मनुष्यबळ, उपचार सुविधा, साधन सामग्रीसह सज्ज होत जिल्ह्याची क्षमता बांधणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले. 

Displaying DSC_5557.JPG

जिल्हाधिकारी कार्यालयात कोवीड उपाययोजनांच्या आढावा बैठकीत श्री.चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोदांवले यांच्यासह सर्व यंत्रणाप्रमुख,  संबंधित विभागांचे अधिकारी नोडेल अधिकारी  उपस्थित होते.

जिल्ह्यातील उपचार सुविधा, ऑक्सीजन निर्मितीसह खाटांची पर्याप्त उपलब्धता याबाबीमध्ये वाढ होत असून तिसऱ्या  लाटेच्या संसर्गाची संभाव्य व्याप्ती लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालय, जिल्हा आरोग्य विभाग, मनपासह सर्वांनी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार ठेवण्यास प्राधान्य दयावे. त्यादृष्टीने घाटीमध्ये व्हेंटीलेटर, आयसीयु व्यवस्थापन आणि बाल कोवीड उपचार याचे विशेष प्रशिक्षण कार्यक्रम अधिक संख्येने घ्यावेत तसेच आरोग्य यंत्रणानी जास्तीत जास्त डॉक्टर, नर्सेस इतर संबंधितांना या प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे निर्देशित करुन जिल्हाधिकारी यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार खाटानिहाय किती मनुष्यबळ आवश्यक आहे,  याचा अहवाल घाटीच्या अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हा शल्य चिकित्सक, मनपा वैद्यकीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समितीने सादर करण्याचे निर्देश दिले.

            ग्रामीण भागातील आठवडी बाजार सुरु करण्यासाठी विक्रेते ग्राहक, व्यापारी यासह  सर्व संबंधितांनी चाचणी, लसीकरण करुन घेणे आवश्यक असून त्यानंतर बाजार भरवण्यास परवानगी देता येईल असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

तसेच जिल्ह्यातील म्युकरमायकोसीसचे रुग्ण संख्येत घट होत असून  जिल्ह्याचा बाधीत दर कमी होत असून सर्व व्यवहार सुरु असल्याने नागरिकांनी संसर्गापासून सुरक्षित राहण्याची खबरदारी घेऊन नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, मोठया प्रमाणात लसीकरण आणि चाचणीसाठी नागरिकांनी पुढे यावे. जेणेकरून सर्व व्यवहार नेहमीसाठी सुरळीतपणे सुरु ठेवता येतील.  असे सूचित करुन जिल्हाधिकारी यांनी संसर्गाचा त्याचसोबत शहर आणि जिल्ह्याच्या प्रवेश नाक्यावरील चाचणी केंद्रे सुरू ठेवावीत फैलाव अधिक प्रमाणात ज्यांच्यापासून होऊ शकतो अशा सुप्रर स्प्रेडर हॉटेल व्यावसायिक, रिक्षाचालक, दुकानदार, व्यापारी यासह सर्व संबंधितांनी प्राधान्याने चाचण्या आणि लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. यासाठी अन्न औषध प्रशासन, आरटीओ, उत्पादन शुल्क, वजनमापे या सह सर्व संबंधित यंत्रणानी पाहणी करुन याबाबींवर  नियंत्रण ठेवावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे तसेच रुग्णालयांचे इलेक्ट्रीक ऑडीटचे अहवाल ही सादर करण्याचे निर्देश संबंधितांना जिल्हाधिकारी यांनी दिले.