रुग्णालयांनी स्वत:चे ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारावे-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

कोवीड उपचारांच्या देयक तपासणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या द्वारे लेखा परिक्षकांची नियुक्ती

औरंगाबाद, दिनांक 20- कोवीडच्या वाढत्या संसर्गात ऑक्सीजनची उपलब्धता कायम ठेवण्याच्या दृष्टीने रुग्णालयांनी स्वत:चे ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प तातडीने उभे करावेत. जेणेकरुन भविष्यात वाढीव रुग्ण संख्येच्या प्रमाणात लागणाऱ्या ऑक्सीजनचा पुरवठा रुग्णांना उपलब्ध करुन देणे शक्य होईल, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.

Displaying _DSC2422.JPG

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खासगी रुग्णालयांमधील ऑक्सीजन, रेमेडीसीवीर इंजेक्शन वापराबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, रिता मेत्रेवार, अप्पासाहेब शिंदे, संगीता चव्हाण यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, खाजगी रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सर्व रुग्णालयांना कोरोना संसर्गाच्या गंभीर परिस्थितीची जाणीव ठेवत अधिक सर्तकतेने ऑक्सीजनचा वापर रुग्ण उपचारात करण्याचे आवश्यक असल्यांचे  सांगून उपलब्ध ऑक्सीजन अत्यंत काटेकोरपणे आणि काटकसरीने वापरणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने रुग्णांना, रुग्णालयातील कर्मचारी, सिस्टर, यांना योग्य त्या सूचना देऊन, ऑक्सीजन वापराचे अधिक प्रभावीपणे नियंत्रण करण्याचे श्री. चव्हाण यांनी सूचित केले. तसेच दिवसेंदिवस रुग्ण संख्येचा वाढता आलेख लक्षात घेऊन आणि आता इतर राज्यातही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर  आवश्यक प्रामणात ऑक्सीजन साठा इतर राज्यांकडून मिळण्यास अडचण येऊ शकते. त्यादृष्टीने रुग्णालयांनी हवेतून ऑक्सीजन वेगळा करुन साठा करण्याची  क्षमता वाढवण्याची, त्यादृष्टीने ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरु करण्याची गरज असून, सिग्मा, माणिक, लाइफलाइन या रुग्णालयांप्रमाणे इतर रुग्णालयांनी ही  तातडीने ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

Displaying _DSC2430.JPG

राज्य शासनाकडे जिल्हयाला लागणाऱ्या ऑक्सीजन साठ्याची मागणी करावयाची आहे, त्यासाठी सर्व रुग्णालयांनी त्यांना आवश्यक असलेल्या ऑक्सीजनची मागणी जिल्हा प्रशासनास तत्परतेने सादर करावी. गरजे इतकीच आणि वस्तूनिष्ठ मागणी नोंदवण्यास रुग्णालयांनी प्राधान्य द्यावे, असे सूचीत करुन जिल्हाधिकारी यांनी रेमेडीसीवीर इंजेक्शनचा साठा ही मर्यादित असून मागणी जास्त आहे.त्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणेच कटाक्षाने रेमेडीसीवीर, ऑक्सीजन वापर करण्याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. तसेच  कोवीड उपचारासाठी शासन दरानेच देयके आकारावी. अतिरिक्त शुल्क घेऊ नये, अन्यथा अशा वाढीव देयकांची प्रशासना मार्फत चौकशी करुन अतिरिक्त आकारलेले पैसे रुग्णास परत करावे लागतील. तरी रुग्णालयांनी वाजवी दरातच कोवीड उपचार करण्यास प्राधान्य द्यावे. या आरोग्य आपत्तीचे गांर्भीय ओळखून सर्व रुग्णालयांनी परस्पर समन्वयातून ऑक्सीजन, इंजेक्शन, रुग्ण उपचार याबाबत एकमेकास सहकार्य करुन रुग्णांला तातडीने योग्य उपचार द्यावे, अशा सूचना श्री. चव्हाण यांनी यावेळी केल्या.

खाजगी रुग्णालयातील ऑक्सीजन वितरण व्यवस्थेची पाहणी प्रशासनामार्फत करण्यात येणार असून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच ऑक्सीजन वापर रुग्णांसाठी करावा.  तसेच 50 खाटा असलेल्या रुग्णालयांनीही स्वत:चे ऑक्सीजन निर्मिती  प्रकल्प सुरु  करण्याच्या सूचना श्री. गव्हाणे यांनी यावेळी दिल्या.

बैठकीस धूत रुग्णालय, कमलनयन बजाज रुग्णालय, श्रध्दा रुग्णालय, अजंता रुग्णालय, एमजीएम रुग्णालय ओरीयन सिटी रुग्णालय, एम्स रुग्णालय, जेजे प्लस रुग्णालय, यासह इतर खाजगी रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर उपस्थित होते.

लेखा परिक्षकांची नियुक्ती

कोवीड उपचारासाठी शासनाचे धोरण व वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश, मार्गदर्शक सूचनांनुसार खाजगी रुग्णालयांनी देयक आकारणे बंधनकारक असून औरंगाबाद जिल्हयातील खाजगी रुग्णालयांकडून आकारली जात असलेली देयके ही अवाजवी स्वरुपात आकारली जाऊ नये, म्हणून सदर देयकांची तपासणी करण्यासाठी सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, औरंगाबाद यांच्या आदेशान्वये लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यायामार्फत कळविण्यात आले आहे..

यानूसार सर्व संबंधीत लेखपरीक्षकांनी त्यांना नेमून दिलेल्या खाजगी रुग्णालायात (DCHC/DCH) दाखल असलेल्या कोवीड  19 रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर अथवा मृत्यू झाल्यानंतर प्रत्येक रुग्णांस आकारण्यात आलेल्या देयकाची तपासणी करावयाची आहे. रुग्णालयांनी त्यांचेकडील कोवीड 19 रुणांना डिस्चार्ज  दिल्यानंतर अथवा मृत्यू झाल्यानंतर प्रत्येक रुग्णांकडून आकारण्यात आलेल्या देयकाची रुग्णनिहाय संपूर्ण माहिती रुग्णांचे नाव, रुग्णाचा एसआरएफ आयडी, रुग्णालयातील वास्तव्याचा कालावधी, बिलाची एकूण रक्कम डिस्चार्ज / मृत्यू, शेरा  या नमुन्यात ही माहिती रोज रात्री 9.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या [email protected] या ईमेलवर कळवणे बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकारी कार्यलयाने यांनी कळविले आहे.