तलावात पडलेल्या आयुषला वाचविण्यासाठी गेलेल्या शाहिदचाही पाण्यात बुडुन मृत्यू ; वैजापूर तालुक्यातील डवाळा गावावर शोककळा 

वैजापूर ,२५ जून/ प्रतिनिधी :-बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा तलावात बुडुन मृत्यु झाला. ही दुर्घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील डवाळा शिवारात घडली. आयुष संतोष पडवळ (वय १३) व शाहीद इरफान सय्यद (वय १८) दोघेही राहणार डवाळा अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे वडाळा गावावर शोककळा पसरली आहे.

आयुष संतोष पडवळ हा बकऱ्या चारण्यासाठी डवाळा शिवारात गेला होता. बकरु पाण्याच्या दिशेने गेल्याने आयुष तलावाकडे गेला असता पाय घसरुन पडला. त्याला वाचवण्यासाठी जवळच असलेल्या शाहिदने पाण्यात उडी टाकली.‌पण पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहता येत नसल्याने दोघांचा पाण्यात बुडुन दुर्दैवी अंत झाला. घटनेची माहिती मिळताच एपीआय राम घाडगे, सहायक पोलिस उपनिरीक्षक रज्जाक शेख, हेड कॉन्स्टेबल भगवान सिंगल यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जलतरणपटू, ग्रामस्थ व पोलिसांनी दोघांना बाहेर काढले.‌ मयत आयुष हा डवाळा येथील मुक्तानंद प्राथमिक विद्यालयाचा आठवीचा विद्यार्थी होता तर शाहीद हा कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी कॉलेजचा विद्यार्थी होता.