वैजापूर पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर

आमदार रमेश बोरनारे यांच्या पाठपुराव्याला यश

वैजापूर,१८ डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासह ठाणेप्रमुख, अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या बांधकामासाठी अखेर मुहूर्त लागला असून याबाबत महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्यावतीने ( मुंबई ) बांधकामाची निविदा काढण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र कार्यालयासह ठाणेप्रमुख व अन्य कर्मचाऱ्यांसाठी एकूण 74 निवासस्थाने बांधण्यात येणार आहे. यात अधिकाऱ्यांसाठी 8 तर पोलिस कर्मचाऱ्यांसाठी 66 निवासस्थाने राहणार असून या बांधकामासाठी 25 कोटी  रुपये मंजूर करण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांच्या निवासस्थांच्या बांधकामासाठी आमदार रमेश बोरनारे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता. 

शहरातील दर्गाबेस परिसरात असलेल्या पोलिसांच्या निवासस्थानांना गेल्या काही वर्षांपासून अवकळा आली असून बहुतांश निवासस्थाने मोडकळीस आली आहे. याशिवाय उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयही गेल्या कित्येक वर्षांपासून भाडोत्री इमारतीत भरविले जात होते. सध्या हे कार्यालय शिवराई रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निवासस्थानात सुरू आहे. ठाणेप्रमुखांच्या निवासस्थानाची अवस्थाही दयनीय झाल्याने ठाणेप्रमुखांनाही भाडोत्री घरात राहवे लागते. पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न ऐरणीवर आल्याने त्यांना आहे त्या परिस्थितीत निवासस्थानांची डागडुजी करून राहवे लागत होते. परंतु आता पोलिस अधिकारी  व कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली असून लवकरच त्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. 

मुंबई येथील महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्यावतीने निवासस्थानांच्या बांधकामाची निविदा मंजूर करण्यात आली आहे. या बांधकामासाठी 25 कोटी 7 लाख 500 रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 74 निवासस्थानांचा समावेश राहणार आहे. यात ठाणेप्रमुखांसह अन्य अधिकाऱ्यांसाठी 8 स्वतंत्र निवासस्थाने एकाच इमारतीत राहणार आहे.  उर्वरित 66 निवासस्थाने पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राहतील. या बांधकामासाठी 22 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या बांधकामासाठी 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. या दोन्हीही निविदा एकत्र काढण्यात आल्या आहेत.  हे बांधकाम पोलिस ठाण्यासमोरील कवायत मैदानावर करण्यात येणार  असल्याची माहिती आमदार रमेश बोरनारे यांनी दिली. 

विशेषतः उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय गेल्या कित्येक दिवसांपासून पोलिस ठाण्याच्या जास्त अंतरावर सुरू होते. आता मात्र हे बांधकाम झाल्यानंतर पोलिस ठाणे व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे कार्यालय जवळ – जवळ राहतील. गेल्या अनेक वर्षांपासून उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासह पोलिसांच्या निवासस्थानांच्या प्रश्न आता धसास लागणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.