सारथीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना तात्काळ कायम नोंदणीपत्र द्या-आ.सतीश चव्हाण यांची मागणी

औरंगाबाद ,१६ मे /प्रतिनिधी :- छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाने दिलेले तात्पुरते संशोधन मान्यता पत्र (Provisional Research Approval Letter) सारथीने ग्राह्य धरले नसल्याने पात्रता धारक विद्यार्थ्यांना तात्काळ कायम नोंदणीपत्र (Confirmation Letter) देण्यात यावे अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्याकडे केली आहे.

          यासंदर्भात आ.सतीश चव्हाण यांनी कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांना आज (दि.15) निवेदन दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी प्रगर्वातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या मेहनती व गुणवत्ताधारक एम.फिल. व पीएच.डी. करणार्‍या विद्यार्थ्यांना सारथी संस्थेच्यावतीने छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (Fellowship) देण्यात येते. सारथीच्यावतीने छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF-2022) या अंतर्गत 23 फेब्रुवारी 2022 रोजी विविध वर्तमानपत्रात तसेच संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करून एम.फील तसेच पीएच.डी. संशोधन अधिछात्रवृत्ती करिता अर्ज मागवले होते. त्यानुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पीएच.डी.साठी पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठाने दिलेले तात्पुरते संशोधन मान्यता पत्र (Provisional Research Approval Letter) जोडून सदरील अर्ज भरले. मात्र सारथीच्यावतीने 13 मे 2022 रोजी संकेतस्थळाव्दारे घोषणा पत्राच्या माध्यमातून आपल्या विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी पूर्ततेकरिता वगळले आहेत. या त्रुटी पूर्ततेकरिता तात्पुरते संशोधन मान्यता पत्र (Provisional Research Approval Letter) ऐवजी कायम नोंदणीपत्र (Confirmation Letter) आवश्यक केले असून ते जमा करण्याची अंतिम मुदत 27 मे 2022 पर्यंत दिलेली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने जानेवारी व फेब्रुवारी 2021 मध्ये पेट (PET) परीक्षा घेण्यात आली. मात्र विद्यापीठाच्या संथ गतीने सुरू असलेल्या पीएच.डी.प्रकि‘येमुळे अद्याप एकाही पात्रताधारक विद्यार्थ्यांला कायम नोंदणीपत्र (Confirmation Letter) देण्यात आलेले नाही. परिणामी सारथीच्यावतीने देण्यात येणार्‍या छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीपासून (Fellowship) हे विद्यार्थी वंचित राहणार असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

सदरील प्रश्नाचा आपण गांभीर्यपूर्वक विचार करून आपल्या विद्यापीठाच्यावतीने ज्या विद्यार्थ्यांना तात्पुरते संशोधन मान्यता पत्र (Provisional Research Approval Letter) दिले होते त्या विद्यार्थ्यांना तात्काळ कायम नोंदणीपत्र (Confirmation Letter) देण्यात यावे अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.