विवाहितेची आत्महत्या ,पतीसह सासू ,नणंद यांना अटक 

औरंगाबाद,१७एप्रिल /प्रतिनिधी

पैशांसाठी वारंवार  त्रास दिल्याने विवाहितेने आपल्या दोन्ही मुलांना  सोबत घेत विहिरीत  उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना 15 एप्रिल रोजी उघडकीस आली. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह सासू व दोन नणंद यांना अटक केली. आरोपींना मंगळवारपर्यंत (दि.20) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.ए. काळे यांनी शनिवारी दि.17 दिले.

सासु शशिकला सुधाकर थोरात (50), पती रविंद्र सुधाकर थोरात (32), नणंद सुनिता आशिष विके (34, तिघे रा. गेवराई ता.जि. औरंगाबाद) आणि आशा आशिष त्रिभूवन (27, रा. चितेगाव ता. पैठण) अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात मृत  वैशाली थोरात हिचा भाऊ  निशीकांत दाभाडे (26, रा. क्रांतीनगर) याने फिर्याद दिली. एप्रिल 2014 मध्ये वैशाली हिचे लग्न आरोपी रविंद्र थोरात याच्याशी झाले होते. त्यांना एक दीड वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षाची मुलगी असे अपत्य होते. 2018 पर्यंत चांगले वागविल्यानंतर आरोपींनी तिला घरगुती कारणावरुन शिवीगाळ व मारहाण सुरु केली. वैशाली माहेरी आल्यावर सासरी होणाऱ्या  त्रासाबाबत सांगत. पतीला मटका खेळण्याची सवय असल्याने तो घरात पैसे देत नाही, पैसे मागितले की, मारहाण करतो, घरखर्चासाठी सासूकडे पैसे मागितल्यास ती माहेरहून पैसे आण असे म्हणत शिवीगाळ करत होते . तरी देखील फिर्यादी व त्यांची आई वैशालीला समजावून सासरी पाठवत. 2019 मध्ये वैशाली सासू व नणंदांच्या त्रासाला कंटाळून पतीसह वेगळी राहण्यासाठी गेली. 2020 मध्ये लॉकडाउन लागल्याने ती पतीसह पून्हा सासरी राहण्यासाठी गेली. त्यावेळी घरगुती कारणवरुन बरेच वाद झाले. वैशालीला तिची नणंद सुनीता ही तू किरायाने रहा, मला या घरात रहायचे आहे. तु घर खाली कर म्हणून शिवीगाळ करित होती. तर आशा त्रिभूवन ही अधून मधून गेवराईला येत तेव्हा तुम्ही अगोदर जसे किरायाने  राहत  होते तसे परत रहा, तसे रहायचे नसेल तर माहेरहून पैसे घेवून ये असे म्हणत नेहमी शिवीगाळ करित होते.

15 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता फिर्यादी हे बॅंकेत असताना वैशालीने फोन करुन रात्री सासू, पती आणि नणंद याच्यासोबत भांडण झाल्याचे सांगितले. त्यावर फिर्यादीने शांत राहण्यास सांगुन सासरच्या लोकांना बोलतो असे सांगितले. त्यानंतर वैशालीने आपल्या दोन्ही मुलांसह घरा जवळील शेतातील विहरीत उडी घेवून आत्महत्या केली.या  प्रकरणात चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 चौघा आरोपींना अटक करुन आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील मनिषा गंडले यांनी कोणत्या कारणाने वैशालीने मुलांसह आत्महत्या केली याचा तपास करणे आहे. मृताच्या  आत्महत्येस प्रवृत्त करण्यास आणखी कोणी प्रवृत्त केले याचा तपास तसेच  त्रास देण्याचा उद्देश काय होता याचा तपास करणे बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.ही विनंती कोर्टाने मान्य केली.