राज ठाकरेंवर औरंगाबादेत गुन्हा दाखल

औरंगाबाद, ३ मे  /प्रतिनिधी :- सांगलीमधील शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढलेले असतानाच औरंगाबादमधील सभेप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात मंगळवारी औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संविधानातील कलम ११६, ११७, १५३ अ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम १३५ नुसार हा गुन्हा दाखल आला आहे. या सभेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादेत सभा घेतली होती. या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे यावरुन टीकेची झोड उठवली होती. या भाषणाप्रकरणी मंगळवारी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात दोन समुहांमध्ये भांडण लावल्याचा आरोप ठाकरेंवर करण्यात आला आहे. तसेच प्रक्षोभक वक्तव्य करणे, अटींचे उल्लंघन केल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा प्रकरणात आता पोलिसांनी तत्काळ कठोर भूमिका घेणार असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता औरंगाबादमध्ये ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन झाल्याचे समोर आल्याने पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यास सरकारनेही संघर्षाची तयारी ठेवावी, असे मनसेच्या संदीप देशपांडे यांनी इशारा दिला आहे.

तर राज ठाकरे यांनी आज शेवटचा दिवस असल्याचे म्हणत मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत मंगळवारी शिवतीर्थावर बैठक बोलावली. याआधीच मनसेच्या कार्यकर्त्यांना १४९ नुसार नोटीस देण्यात आल्या आहेत. यानंतर राज्यात घडामोडींना वेग आला असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तत्काळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. त्याआधी त्यांनी पोलीस महासंचालकांसोबत बैठक घेतली.

राज ठाकरेंच्या अल्टिमेटमवर पोलीस महासंचालकांची पत्रकार परिषद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेट दिला होता. तसेच औरंगाबादेत राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाची औरंगाबाद पोलिसांकडून तपासणी केली. या ‘अल्टिमेट’ वर महासंचालकांनी पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत १५००० जणांवर कारवाई होणार असल्याचे सांगितले.
मनसे नेत्यांकडून कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन झाले नाही, आणि त्यामुळे ही कारवाई त्यांच्यावर करण्यात येणार आहे. देशातल्या जनतेने देखील शांतता आणि सुव्यवस्था राखून पोलिसांना सहकार्य करावे, असे महासंचालक म्हणाले. सामाजिक एकोपा टिकून रहावा यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे कोणीही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे रजनीश शेठ म्हणाले.

राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचे भाऊ म्हणून सौम्य कलमं -एमआयएमचा आरोप

राणा दाम्पत्याला एक वागणूक आणि राज ठाकरे यांना वेगळी का?

राज ठाकरेंनी केलेल्या एकूण भाषणातील शेवटच्या साडेचार मिनिटाच्या भाषणामुळे त्यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याच दरम्यान एमआयएमने राज ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाऊ असल्याने त्यांच्यावर सौम्य कलमं लावून गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. 

एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील म्हणाले आहेत की, ”माझ्या मनात एक शंका येते, माझा भाऊ आहे म्हणून मी त्यावर कशाला देशद्रोहाची कलमे लावू. मी नवनीत रानावर लावू शकतो, मी दुसऱ्यांवर लावू शकतो, असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल.” ते म्हणाले, ”सर्व मोठ्या पक्षाची बैठक झाली, त्यात ठरवल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर ही कलमे लावण्यात आली आहे. राष्ट्रवादीला असं वाटलं असेल, पुढे त्यांना मनसे सोबत जाण्याची वेळ आली तर काय होणार, म्हणून त्यांच्यावर कडक सेक्शन लावू नये. आम्ही काहीतरी केलं, हे दाखवण्यासाठी सरकारने त्यांच्यावर ही सौम्य कलमं लावली आहेत. राणा दाम्पत्याला एक वागणूक आणि राज ठाकरे यांना वेगळी का, ज्या कलामांतर्गत राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे, तीच कलमे राज ठाकरे यांच्यावर लावावीत, अशी मागणी त्यांनी सरकारला केली आहे.