शेतकऱ्यांनी चिंता करू नये ; जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद,१२ सप्टेंबर /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले असून या झालेल्या नुकसानीची महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना धीर दिला. दरम्यान आज रविवार ( दि.12 ) रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, खुलताबाद व गंगापूर तालुक्यातील विविध गावात शेताच्या बांधावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली.

May be an image of 12 people, people standing, outdoors and tree

औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लक्ष ठेवून आहेत. झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्री दररोज आढावा घेत असून शेतकऱ्यांनी चिंता करू नये अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार याप्रसंगी म्हणाले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपासुन एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेत झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

May be an image of 6 people, people standing, tree and outdoors

औरंगाबाद जिल्ह्यातील बऱ्याच मंडळात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये पाणी साचले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मूग, उडीद, सोयाबीन,तूर, कापूस या पिकांना मोठा फटका बसला असून फळपीकही उध्वस्त झाले आहे. जनावरे, रस्ते,पूल तसेच घरांचीही पडझड झाली असून महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणांनी तातडीने पंचनामे करावे. जेणे करून तंतोतंत नुकसानीची माहिती समोर येईल. पंचनामे पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मदती बाबत घोषणा करतील असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.

May be an image of 3 people, people standing, tree and grass

यावेळी वैजापूर चे आमदार प्रा. रमेश बोरणारे, माजी आ. नितीन पाटील, जि. प.बांधकाम सभापती किशोर बलांडे, आरोग्य सभापती अविनाश गलांडे, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, गंगापूर चे तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह विविध गावातील सरपंच व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.