४ मे पासूनचा आंदोलनावर मनसे ठाम,राज ठाकरेंना मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस

मुंबई , ३ मे  /प्रतिनिधी :- मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात ४ मे पासून आंदोलन करण्यावर मनसे ठाम असून, हे आंदोलन कसे करावे या बाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्याना सूचना दिल्या आहेत. कुठल्याही प्रकारे कायद्याचे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होणार नाही याची आपल्याकडून दक्षता घेतली गेली पाहिजे अश्या सूचना राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत.

Image


 

Image
Image


 
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना ५ सूचना केल्या आहेत.

  • ज्या ठिकाणी अनधिकृत भोंग्यांवरून केली जात आहे अश्याच ठिकाणी भोंग्यांवरून हनुमान चालीसा लावा.
  • मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याआधी रीतसर परवानगी घ्या.
  • अनधिकृत अजान सुरु झाल्यास पोलिसांकडे तक्रार करा.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होत असेल तर आंदोलन करा.
     
    अशा सूचना देऊन आपले आंदोलन कायद्याच्या चौकटीतच राहून करा असा आदेश राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. औरंगाबाद येथे झालेल्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन झाल्याच्या आरोपावरून राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाले आहेत.याच पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता मुंबईत पोलिसांनी राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे.

मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनने राज ठाकरे यांना कलम 149 ची नोटीस बजावली आहे.  शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कसबे यांनी ही नोटीस बजावली आहे. आज संध्याकाळी शिवाजी पार्क पोलिसांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बंदोबस्त वाढवला होता. त्यानंतर राज ठाकरे पत्रक प्रसिद्ध करून माघार घेणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आज एक पत्र प्रसिद्ध करून सर्वांना आवाहन केले आहे. या पत्रात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.

‘हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी “सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत” हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे’ असं आव्हानच राज ठाकरेंनी दिलं आहे.

  देशात इतकी कारागृहं नाहीत की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबणे सरकारला शक्य होईल! हेसुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावे, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.

उद्या ४ मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोंग्यांवर हनुमान चालीसा लावावी. भोंग्यांचा त्रास काय होतो, हे त्यांनाही समजू दे. आम्हाला देशातली शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत. परंतु आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही’ असंही राज ठाकरेंनी ठामपणे सांगितलं.