आघूर शिवारात घर फोडी ; 2 लाखांचा ऐवज लंपास

वैजापूर,२२ एप्रिल  /प्रतिनिधी :-घराच्या पाठीमागील खिडकीचे गज कापून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा दोन लाख 12 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरांनी पळवला. चोरांनी या घराजवळील रेशमा बागुल या ग्रामसेविकेच्या घरातही हात साफ करत विविध बॅकांचे चेक बुक व एटीएम कार्ड असलेली पर्स लंपास केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.

ही घटना बुधवारी मध्यरात्री बाजरी फार्म जवळ आघुर शिवारात उघडकीस आली.‌ पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आघूर येथे भगवान राजपूत हे कुटुंबासह राहतात.‌ अज्ञात चोरांनी बुधवारी मध्यरात्री त्यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या खिडकीचे गज कटरने कापून घरातील कपाट व सुटकेसमध्ये ठेवलेले पाच तोळ्याच्या दोन सोन्याच्या पोत, दिड तोळ्याची सोनसाखळी, एक तोळ्याची सोन्याची अंगठी व 25 हजार रुपये रोख असा दोन लाख 12 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. तसेच राजपूत यांच्या घराशेजारी राहणाऱ्या रेशमा बागुल यांचे घर फोडून बॅकांची कागदपत्रे व एटीएम असलेली पर्स थांबवली.

या प्रकरणी राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय वैद्य करीत आहेत.