औरंगाबाद सिडकोत पाण्याची पुन्हा बोंब :भाजप आक्रमक

पाण्याच्या टाकीवर आंदोलनानंतर महापालिका आयुक्तांना घेराव,आज बैठक

औरंगाबाद,४ एप्रिल / प्रतिनिधी :- पाणी पुरवठ्याचे योग्य प्रकारे नियोजन होत नसल्यामुळे सिडकोवासियांचे हाल सुरू आहेत. जलकुंभाच्या खालीच वसाहत असलेल्या सिडको  भागातील नागरिकांनी पाण्यासाठी आंदोलन केले. आंदोलनानंतरही नागरिकांनी पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शाश्वती नाही.
जायकवाडी धरण पूर्णपणे भरलेले असताना औरंगाबाद शहरात मात्र पाचव्या दिवशीच पाणी पुरवठा होतो. त्यातही सिडको भागात सहाव्या-सातव्या दिवशी पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थेत तांत्रिक बिघाड झाल्यास नवव्या-दहाव्या दिवशी सिडको-हडको भागातील काही सेक्टरना पाणी पुरवठा होतो. पाणी पुरवठ्यात वाढणारा गॅप भरून काढण्यासाठी मात्र काहीच प्रयत्न होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पाचव्या दिवशी पाणी पुरवठा होत असला तरी तो सुरळीत व्हावा अशी नागरिकांची माफक आपेक्षा असताना पाणी पुरवठ्याच्या वेळा पाळल्या जात नाहीत.

आज रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केनेकर यांच्या नेतृत्वाखाली एन -५ सिडको पाण्याच्या टाकी समोर शहरातील नागरिकांच्या हक्काच्या पाण्यासाठी व कुंभकर्ण च्या झोपेत असलेल्या या सत्ताधारी प्रशासनाच्या कानठळ्या बसवून जागी करण्यासाठी आज तीव्र आंदोलन करण्यात आले.तसेच मनपा प्रशासन व आयुक्त यांनी आंदोलन ठिकाणी भेट व दखल न घेतल्यामुळे आंदोलन कर्ते पदाधिकारी हे दोन बस भरून मनपा आयुक्त यांच्या निवासस्थानी जाऊन घेराव घालत निवेदन देण्यात आले.

वाढत्या उन्हाबरोबर सिडको-हडकोवासीयांना पाणी टंचाईचे चटके बसू लागले आहेत. आठ-दहा दिवसांच्यानंतर पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समान पाणी पुरवठ्याचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

औरंगाबाद शहरासाठीची सध्या अस्तित्वात असलेली पाणी पुरवठा योजना कालबाह्य झाली आहे, त्यामुळे शहराच्या लोकसंख्येच्या दृष्टीने जेवढे पाणी जायकवाडीहून शहरासाठी आणणे गरजेचे आहे तेवढे पाणी आणले जात नाही. त्याचा परिणाम म्हणून शहराला पाचव्या दिवशी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शहराच्या सध्याच्या लोकसंख्येसाठी २०० एमएलडी पाण्याची दररोज आवश्यकता आहे, पण केवळ १२५ एमएलडी पाणी उपलब्ध होते. त्यामुळे उपलब्ध होणारे पाणी नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या पाचव्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
 सिडको-हडकोचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने नक्षत्रवाडीहून या एक्स्प्रेस जलवाहिनी टाकण्यात आली, परंतु या जलवाहिनीवरुन पालिकेने विविध वसाहतींसाठी क्रॉस कनेक्शनच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणे सुरू केले. त्यामुळे सिडको-हडकोसाठीचे पाणी अन्य वसाहतींमध्ये विभागले गेले. त्याचा परिणाम म्हणून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. प्रामुख्याने उन्हाळ्यात सिडको-हडकोभागात पाण्याची समस्या अधिक तीव्र होते. यंदाही अशीच स्थिती निर्माण झाली आहे.