पंतप्रधानांच्या ऑनलाईन उपस्थितीत औरंगाबाद जिल्ह्यातील 26 अनाथ बालकांना प्रमाणपत्र वाटप

औरंगाबाद ,३० मे /प्रतिनिधी :- औरंगाबाद पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत कोरोनामुळे दोन्ही पालक
गमावलेल्या देशभरातील अनाथ बालकांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत
महत्वाच्या कागदपत्रांचे वाटप करण्यात आले.

Image

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील 26 अनाथ बालके यावेळी उपस्थित होते. त्यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यातठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे मुलांना संदेशपत्र अशा साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी आमदार अतुल सावे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम, जिल्हा परिविक्षाअधिकारी बी. एल. राठोड, जिल्हा संरक्षण अधिकारी महादेव डोंगरे यांच्यासह महिला बाल कल्याण
विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Image


तुमच्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्यासाठी संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे. पुस्तक हे तुमचे मार्गदर्शक
असून साहसाने तुम्ही आयुष्यात येणारे अडथळे पार कराल. स्वत:वर विश्वास ठेवा. फिट इंडिया आणि खेलो
इंडिया अभियानाशी जोडले जा. योगासनांना आपल्या जीवनात एक महत्वाचे स्थान आहे ते करीत जा, असा
संदेश पंतप्रधानांनी यावेळी बालकांना उद्देशून दिला. कोरोनामुळे औरंगाबाद जिल्ह्यात दोन्ही पालक
गमावलेल्या मुला-मुलींची संख्या 26 आहे. हे सर्व आज उपस्थित होते त्यांना आरोग्य विमा कार्ड, टपाल
खात्यात ठेव ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे शुभेच्छा पत्र अशा साहित्याचे वाटप करण्यात आले.

Image


जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी बालकांसोबत आस्थेवाईपणे संवाद साधत त्यांच्या जेवण,
आरोग्य आणि शाळेच्या प्रवेशाबरोबरच शिक्षणाविषयी मनमोकळा संवाद साधला, आपलेपणाच्या भावनाने
जिल्हा प्रशासन आपल्याला सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे यावेळी सांगितले. तुम्ही चांगला अभ्यास करा
आणि विविध क्षेत्रात आपला नावलौकिक मिळवा, यासाठी मदतीसह आमच्या शुभेच्छा आहेत. चांगले नागरिक
बनण्यासाठी शिक्षण पूर्ण करा. समाज आपल्या सोबत आहे. तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही सर्वजण
आहोत, असा दिलासाही श्री. चव्हाण यांनी उपस्थित बालकांना दिला.