सुनेचा खून केल्याप्रकरणात आरोपी सासू-सासऱ्याला अटक

सातारा पोलिसांना तीन महिन्यांनंतर  आरोपीला जेरबंद करण्यात यश 

औरंगाबाद ,२०एप्रिल /प्रतिनिधी

माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावत सुनेचा खून केल्याप्रकरणात सातारा पोलिसांनी तब्बल तीन महिन्यांनी आरोपी सासू—सासऱ्याला सोमवारी दि.१९ दुपारी अटक केली. समियोद्दीन चिरगोद्दीन सिद्दीकी (५१) आयशा समियोद्दीन सिद्दकी (४८, दोघे रा. अब्रार कॉलनी) अशी आरोपींची नावे असून त्यांना बुधावारपर्यंत दि.२१ पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी मंगळवारी दि.२० दिले.गुन्ह्यात यापूर्वी पोलिसांनी आरोपी पती अनिसोद्दीन सिद्दीकी याला अटक केली तर न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

या प्रकरणात मृत कुसलूम हिचे वडील वाहिद बेग सत्तार बेग मिर्झा (५४, रा. मनभा, ता. कारंजा लाड जि. वाशिम) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, कुसलूम हिचे लग्न २८ ऑक्टोबर २०१६ रोजी अनिसोद्दीन सिदीक्की याच्याशी झाले होते. माहेरहुन दोन लाख रुपये घेवुन ये म्हणत कुसलूमचा पती अनिसोद्दीन, सासरा समियोद्दीन, सासु अयशा व दीर दानिश हे वारंवार मारहाण करित होते. त्यामुळे २०१७ मध्ये वाहिद बेग यांनी आरोपींना रोख एक लाख रुपये दिले. त्यानंतरही आरोपी हे पीडितेचा छळ करुन तिला घटस्फोट देण्यास सांगत होते. २०१९ मध्ये पीडितेला अनिसोद्दीन याने चाकुने मारहाण केली होती, त्यावेळी कारंजा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता, तेंव्हा तक्रार निवारण केंद्रव्दारे त्यांच्यात दिलजमाई होऊन  पीडिता पुन्हा सासरी नांदण्यासाठी गेली होती.

आरोपींना पुन्हा माहेरहुन दोन लाख रुपये आण असा तगादा लावत तिला मारहाण सुरु केली होती. ३ ऑक्टोबर २०२० रोजी पीडितेने फोन करुन आरोपींनी दोन लाख रुपये आण नसता तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देत असल्याचे सांगितले. त्यावर वाहिद बेग यांनी पीडितेची समजूत काढली. ४ ऑक्टोबर रोजी आरोपी अनिसोद्दीन याने फोन करुन कुसलूमचा मृत्यु झाल्याचे सांगितले. गुन्ह्यात वैद‍्यकिय अहवाल प्राप्‍त झाल्यानंतर आरोपींविरोधात  सातारा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. प्रकरणात सहायक सरकारी वकील एन.ए. ताडेवाड यांनी काम पाहिले.