अल्पवयीन मुलीचा विनयभंग :आरोपी अक्षय युवराज गायकवाड याला पाच वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद ,२१ एप्रिल  /प्रतिनिधी :-वारंवार पाठलाग तसेच बोलण्‍याचा प्रयत्‍न करुन लग्न करण्‍याचा तगादा लावत अल्पवयीन मुलीच्‍या घरात शिरुन तिचा विनयभंग करित शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपी अक्षय युवराज गायकवाड (२२, रा. उस्‍मानपुरा) याला पाच वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली सहा हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्‍यायाधीश आर.एस. निंबाळकर यांनी ठोठावली.

बरोबरच पीडितेला नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करुन देण्‍याबाबत निकालीची एक प्रत जिल्हा व विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठविण्‍याचे आदेश देखील न्‍यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणात १७ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, आरोपी हा पीडितेचा बर्याच दिवसांपासून पाठलाग करुन बोलण्‍याचा प्रयत्‍न करित होता. पीडिता कॉलेजला जात-येत असतांना देखील तिचा पाठलाग‍ करित होता. कधी दारु प्राशनकरुन पीडितेच्‍या घरा समोर उभा राहुन तिच्‍या नावाने मोठ-मोठ्याने आरडा-ओरड करित होता. याबाबत पीडितेने आई-वडीलांना सांगितले, मात्र आरोपी हा गुंड प्रवृत्तीचा आहे, त्‍याची मेाहल्ल्यात दहशहत असल्याने पीडितेच्‍या आई-वडीलांनी पोलिसात तक्रार देण्‍यास चालढकल केली. दरम्यान आरोपीने पीडितेच्‍या लहान भावाला रस्‍त्‍यात गाठले, व तुझ्या बहिणीला माझ्या सोबल लग्न करण्‍यास सांग अन्‍यथा तुला मारुन टाकीन अशी धमकी दिली.

३० मार्च २०१९ रोजी दुपारी दोन वाजेच्‍या सुमारास पीडिता तिची आई व भाऊ घरामध्‍ये असतांना आरोपी अक्षय गायकवाड हा जबरदस्ती त्‍यांच्‍या घरात शिरला, त्‍याने पीडितेचा हात पकडून माझ्या सोबत लग्न कर असे म्हणाला, त्‍यावर पीडिता व तिच्‍या आईने प्रतिकार केला असता मी तुझे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी आरोपीने दिली. त्‍यानंतर पीडितेच्‍या आईने त्‍याला घराबाहेर जाण्‍यास सांगितले असता, त्‍याने शिवीगाळ करुन पीडितेच्‍या भावाला लोटून दिले. आरडा-ओरडा ऐकून आरोपीची आई तेथे आली तिने पीडितेच्‍या आईला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. प्रकरणात उस्‍मानपुरा पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

तपास अधिकारी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता बी.आर. लोया यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तसेच आरोपीवर यापूर्वी अशाचप्रकारचे दोन गुन्‍हे दाखल असल्याचे न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणुन दिले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी अक्षय गायकवाड याला दोषी ठरवून भादंवी कलम ३५४ अन्‍वये पाच वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड, कलम ३५४ (डी) अन्‍वये तीन वर्षे सक्तमजुरी, एक हजाररुपये दंड, कलम ३५२ अन्‍वये पाच वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड आणि पोक्सोच्‍या कलम १२ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणुन जमादार अश्‍पाक कादरी यांनी काम पाहिले.या