शनिदेवगांव व बाजाठाण येथे गोदावरी नदीवर उच्चपातळीच्या बंधारा प्रस्तावास मंजुरी द्यावी-आ.रमेश पाटील बोरणारे

वैजापूर ,२६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील विविध सिंचन प्रकल्पाच्या प्रश्नांसदर्भात तालुक्याचे आ.रमेश पाटील बोरणारे यांनी आज राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.वैजापूर तालुक्यातील शनिदेवगांव व बाजाठाण येथे गोदावरी नदीवर उच्चपातळीच्या बंधारा प्रस्तावास मंजुरी द्यावी अशी मागणी आमदार बोरणारे यांनी केली. 

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत आ. रमेश पाटील बोरणारे यांनी श्री.पाटील यांना वैजापूर तालुक्यातील सिंचनाच्या प्रश्नाबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वैजापूर तालुक्यातील शनिदेवगांव व बाजाठाण येथे गोदावरी नदीवर उच्चपातळीच्या बंधारा प्रस्तावास मंजुरी द्यावी. तसेच वैजापूर शहरालगतच्या नारंगी धरणांत नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणाचे डाव्या कालव्याद्वारे पाणी आणण्यासाठी वितरीकेचे खोलीकरण व रुंदीकरण कामासाठी जलसंधारण विभागाद्वारे 38 कोटींचे काम मंजूर असून प्रशासकीय मान्यताही झालेली आहे परंतु अद्याप या कामाचे टेंडर प्रोसेस पूर्ण झाले नाही.या कामाचे टेंडर प्रोसेस लवकर होण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावे.नाशिक जिल्ह्यातील दारणा समूहातील पाणीपुरवठा धरणांचे नियोजन व नियंत्रण पाटबंधारे विभागाच्या औरंगाबाद कार्यालयातून व्हावे.अशी मागणीही आ. बोरणारे यांनी या निवेदनात केली आहे.