वैजापूर नगरपालिकेच्यावतीने दिवाळीनिमित कर्मचाऱ्यांना सणासाठी अग्रीम रक्कम व गणवेशाचे वाटप

वैजापूर ,३ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर नगर पालिकेच्यावतीने दिपावलीनिमित्त  कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे प्रत्येकी दोन गणवेष व सणासाठी अग्रीम रकमेचे वाटप तसेच महागाई भत्याची थकबाकी असलेली 12 लाख 96 हजार 533 रुपयांची रक्कम नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी व उपनगराध्यक्ष साबेरखान यांच्याहस्ते बुधवारी वितरीत करण्यात आली.
पालिकेच्यावतीने फुले-आंबेडकर सभागृहात  दीपावलीनिमित्त स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रमाणे दोन गणवेष, महिला कर्मचाऱ्यांना दोन साड्या आणि सणासाठी अग्रीम रक्कम वाटप करण्यात आली. पालिका कर्मचाऱ्यांचे महागाई भत्याचे थकबाकी असलेले 12 लाख 96 हजार 533 रुपये, सणासाठी अग्रीम 7 लाख 10 हजार रुपये आणि सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्याचे पगार 1 कोटी 77 लाख रुपये अशी एकूण 2 कोटी रुपयांची रक्कम यावेळी वाटप करण्यात आली. स्वच्छता सर्वेक्षणअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या जनाबाई सदाशिव त्रिभुवन,अमोल भालेराव व रवी फुलारे या तीन कर्मचाऱ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.याप्रसंगी पालिकेचे मुख्याधिकारी बी.यु.बिघोत यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.