वैजापूर तहसील कार्यालयाने भाडे तत्वावर घेतलेल्या जीपचे 15 लाख 20 हजार रुपये थकीत वाहन भाडे मिळत नसल्याने वाहन मालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

वैजापूर,२३ मार्च  /प्रतिनिधी :-शासकीय दौरे व कार्यालयीन कामासाठी वाहनाची तात्काळ आवश्यकता असल्याने वैजापूरच्या तहसीलदारांनी भाडेतत्वावर घेतलेल्या स्कॉर्पिओ जीपचे 26 ऑगस्ट 2018 पासूनचे थकीत असलेले वाहन भाडे 15 लाख 20 हजार रुपये मिळत नसल्याने वाहन मालक विलास केशवराव लांडगे (रा.दुर्गानगर, वैजापूर) याने 21 मार्च 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,औरंगाबाद येथे अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी वाहनाच्या थकीत भाड्याची रक्कम काढून देण्याचे आश्वासन दिले आहे.

Displaying IMG-20220323-WA0103.jpg

यासंदर्भात वाहन मालक विलास लांडगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, तहसीलदार वैजापूर यांनी 26 ऑगस्ट 2018 रोजी मला तहसील कार्यालयात बोलावून त्यांचे कार्यालयीन कामासाठी शासकीय वाहन उपलब्ध नसल्याने  त्यांना शासकीय दौरे व कार्यालयीन वापरासाठी वाहनाची तात्काळ आवश्यकता असल्याने माझे वाहन (क्रमांक एमच -17, एझेड- 8366) शासकीय दरानुसार भाडे तत्वावर घेत असून शासकीय वाहन उपलब्ध होईपर्यंत वापरणार असल्याचे सांगितले. त्यानुसार 27 ऑगस्ट 2018 पासून माझे वाहन  तहसील कार्यालय वैजापूर येथे वापरत आहे.

वाहनाचे भाडे अदा करण्यासाठी तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधीची मागणी केली आहे. परंतु अद्यापपर्यंत माझे थकीत असलेले वाहन भाडे 15 लाख 20 हजार रुपये मिळाले नाही. वेळोवेळी पाठपुरावा करूनही वाहन भाड्याचे पैसे मिळाले नाही. माझ्या कुटुंबाचे उदरनिर्वाह कर्ज काढून करीत आहे. मला झालेल्या मानसिक त्रासाला कंटाळून मी 21 मार्च 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे आत्मदहन करणार असून,माझ्या या परिस्थितीला संबंधित अधिकारी जबाबदार असतील. निवेदनानुसार विलास लांडगे हे सोमवारी ता.21मार्च रोजी जिल्हाधिकारी औरंगाबाद कार्यालय येथे गेले असता अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी त्यांना वाहनाचे थकीत भाड्याची रक्कम काढून देण्याचे आश्वासन दिले.