उद्योगांची ‘महास्वयम्’ ला पसंती

Image

३८९ उद्योगांची १ हजार ३०७ रिक्‍तपदांची भरती प्रक्रिया सुरु – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

मुंबई, दि. २ – लॉकडाऊनमुळे निर्माण होत असलेल्या बेरोजगारीवर मात करुन तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या  http://www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलचा वापर नोकरीइच्छुक तरुणांबरोबरच कुशल उमेदवारांची गरज असलेले उद्योगही करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात वेबपोर्टलला १ हजार ५२१ उद्योजकांनी भेट दिली असून ३८९ नवीन उद्योजकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शिवाय या उद्योगांनी त्‍यांच्याकडे असलेल्या १ हजार ३०७ रिक्‍तपदांची भरती प्रक्रिया वेबपोर्टलच्या आधारे सुरु केली असून त्यांना त्याच वेबपोर्टलवर नोंदणीकृत असलेले पात्र कुशल उमेदवार मिळत आहेत, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

Image

महास्वयम् वेबपोर्टलवर आतापर्यंत ८४ हजार ९५१ उद्योगांनी नोंदणी केली आहे. उद्योग आणि त्यांना हवे असलेले कुशल मनुष्यबळ यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे महत्वाचे काम या वेबपोर्टलमार्फत होत आहे. वेबपोर्टलवर कुशल उमेदवार हे आपली शैक्षणिक माहिती, अनुभव, कौशल्ये यांच्या आधारे नोंदणी करतात. त्यामुळे उद्योगांना हवे असलेले कुशल मनुष्यबळ त्यांच्या गरजेनुसार या वेबपोर्टलवर सहज उपलब्ध होते. यासाठी उद्योग आणि बेरोजगार तरुण यांची वेबपोर्टलवर अधिकाधिक नोंदणी करुन दोघांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी कौशल्य विकास विभाग प्रयत्न करीत आहे.

नोंदणी केलेले व प्रोफाईल अद्ययावत न केलेले तसेच एका जिल्‍ह्यातून दुसऱ्या जिल्‍ह्यात स्‍थलांतरित झालेल्‍या उमेदवारांना रोजगाराच्‍या संधीची माहिती होण्‍यासाठी त्‍यांना त्‍यांचे प्रोफाईल अद्ययावत करण्‍याबाबत वर्तमानपत्राच्‍या माध्‍यमातून तसेच वेबपोर्टलद्वारे जून २०२० पासून एसएमएस पाठविण्‍यात येत आहेत. तेव्हापासून आतापर्यंत लॉकडाऊनच्या काळात वेबपोर्टलला ६.३४ लाख उमेदवारांनी भेट दिली आहे. यापैकी ३ लाख ०५ हजार उमेदवार हे नव्‍याने प्रथम भेट देणारे होते. तसेच नोकरीइच्छुक ३१ हजार १५८ उमेदवारांनी नवीन नावनोंदणी केली आहे. १० हजार उमेदवारांनी प्रोफाईल अद्ययावत केले असून ६३१ उमेदवारांनी त्‍यांचे प्रोफाईल अॅक्‍टिव्‍ह केले आहे, अशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली.

नोंदणी न केलेले पण मनुष्‍यबळाची आवश्‍यकता असलेले उद्योग त्‍यांना त्‍यांच्याकडे असलेल्या रिक्‍तपदांची मागणी या वेबपोर्टलवर अधिसूचित करु शकतात. तसेच रोजगार इच्छुक उमेदवारांची यादी प्राप्‍त करुन घेऊ शकतात. तथापि, त्‍यानंतर त्‍यांना वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्‍यक आहे.

जिल्‍हा कार्यालयांना त्‍यांच्‍या जिल्‍ह्यांमध्‍ये स्‍थलांतरित झालेल्‍या उमेदवारांना तसेच ज्‍या उमेदवारांनी त्‍यांचे प्रोफाईल अद्ययावत केले नाही त्‍यांना प्रोफाईल अद्ययावत करण्‍यासाठी एसएमएस पाठविण्‍याची सुविधा वेबपोर्टलवर उपलब्‍ध करुन देण्यात आली आहे.

सर्व उमेदवार व उद्योजक यांनी http://www.mahaswayam.gov.in या वेबसाईटद्वारे देऊ केलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचणी असल्यास आपल्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री श्री. नवाब मलिक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *