बजाज नगर येथील ममता मेमोरियल हॉस्पिटलची कोविड केअर सेंटरची मान्यता रद्द

रंगाबाद,२५ मे /प्रतिनिधी :- बजाज नगर येथील ममता मेमोरियल हॉस्पिटलला असलेली डेडीकेटेड कोविड केअर सेंटर बाबतीत प्राप्त तक्रारीच्या चौकशीअंती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ममता  हॉस्पिटलीची कोविड केअर सेंटरची मान्यता रद्द केली आहे.  सध्या कोरोना साथरोगामुळे  आंतररुग्ण म्हणून भरती असलेल्या रुग्णांचे पूर्ण उपचार करुन नंतरच सुट्टी द्यावी, तसेच  25 मे नंतर ह्या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही नवीन कोरोना रुग्णास आंततरुग्ण म्हणून दाखल करण्यात येऊ नये किंवा कोरोना विषाणू साथरोगाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची सेवा देण्यात येऊ नये असे देखील  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी   सदर हॉस्पिटलला लेखी आदेशित केले आहे.

          सदरच्या हॉस्पिटलविरोधात रुग्ण न्याय हक्क परिषद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मान्यता रद्द करणेबाबत तक्रार दाखल केली होती. कोविड हेल्थ सेंटर चालु करतांना लागणाऱ्या आवश्यक परवानग्या नसताना बेकायदेशीर चालु असलेल्या हॉस्प्टिलची मान्यता रद्द करण्यात यावी तसेच गोरगरीब, शेतकरी कामगार रुग्णांची लाखो रुपयांची लुट करीत आहे व नियमाप्रमाणे पैसे न घेता मनमानी करुन रुग्णांकडून बिल घेत असल्याचे देखील तक्रारीत नमुद करण्यात आले होते. सदर तक्रारींची चौकशी करण्यासाठी डॉ. जी.एम. कुडलीकर, डॅॉ. विजयकुमार वाघ, डॉ. प्रशांत दाते, डॉ. बामणे यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. ह्या समितीने चौकशी करुन अहवाल प्रशासनास सादर केला. प्राप्त अहवालाची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ममता  हॉस्पिटलीच्या कोविड केअर सेंटरची मान्यता रद्द केली आहे.