निष्काळजीपणे वाहन चालवून पोलिसांनाच शिवीगाळ,दोघा आरोपींना तीन वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद,२ मार्च / प्रतिनिधी :-निष्काळजी पणे वाहन चालवून वर पोलिसांनाच शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या दोघां आरोपींना तीन वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली एकूण चार हजारांच्‍या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एम.ए. मोटे यांनी बुधवारी दि.२ मार्च रोजी ठोठावली. 

मिल कॉर्नर येथील पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले तत्‍कालीन पोलीस शिपाई विनोद शंकरसिंग परदेशी (३७) हे ५ रोजी पीआर -३ मोबाईल कार्यरत होते. पहाटे अडीच वाजेच्‍या सुमारास टी.व्ही सेंटर चौकात बद्रीनाथ बालचंद वाघ आणि सुरेश नवनाथ वागमोडे हे दोघे के-१० अल्टो कार (क्रं. एमचए-२०-बीव्हाय-१६६७) निष्काळजी पणे चालवत होते. त्यामुळे विनोद परदेशी व त्यांच्या सहकार्यांनी दोघांना कार थांबविण्याचा इशारा केला. मात्र आरोपींनी कार न थांबवता उलट पोलिसांच्याच अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच आम्हला का अडविता, तुम्हाला गाडी अडविण्याचा अधिकार नाही अस म्हणत आरोपींनी परदेशी व त्यांच्या सहकार्यास शिवीगाळ करुन मारहाण केली. या प्रकरणी पोलिस शिपाई विनोद परदेशी यांच्या तक्रारीवरुन कार चालक बद्रीनाथ वाघ व सुरेश वागमोडे यांच्या विरुध्द सिडको पोसिल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खटल्याच्‍या सुनावणीवेळी, सहायक लोकाभियोक्ता अजित अंकुश, बी.एन. अढावे आणि एस.बी. सुर्यवंशी यांनी सात साक्षीतदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी हे मद्य प्राशन करुन वाहन चालवत असल्याचे डॉक्‍टरांनी दिलेल्या वैद्यकिय अहवालावरुन सिध्‍द होत असल्याचे निरीक्षण नोंदवत दोघा आरोपींना दोषी ठरवले. व आरोपींना भादंवी कलम ३५३ अन्‍वये तीन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी एक हजार रुपये दंड, कलम ३३२ अन्‍वये तीन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.