तर्पण पुरस्कार सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते स्वावलंबी युवक-युवती सन्मानित

मुंबई, दि. 2 : अनाथ असून देखील जीवनात शिक्षण प्राप्त करून प्रगतीची शिखरे गाठणाऱ्या ५ युवक युवतींना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज तर्पण युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले.

अठरा वर्षावरील अनाथ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, भावनिक व आर्थिक पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या तर्पण फाउंडेशनतर्फे राजभवन येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भारतीय संस्कृती संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ विनय सहस्रबुद्धे, तर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत भारतीय, श्रेया भारतीय व पार्श्वगायक स्वप्नील बांदोडकर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी अमृता करवंदे, अभय, सुलक्षणा, नारायण इंगळे व मनोज पांचाळ या युवक युवतींना तर्पण युवा पुरस्कार देण्यात आले.

श्रीकांत भारतीय यांनी तर्पण संस्थेच्या माध्यमातून ५०० पेक्षा अधिक अनाथ युवक-युवतींना मदतीचा हात देऊन आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचे केलेले कार्य स्तुत्य असून हे कार्य राष्ट्रव्यापी व्हावे असे उद्गार राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी काढले.

अठराव्या वर्षात पदार्पण केल्यावर अनाथ मुलांना अनाथगृहातून बाहेर पडावे लागते. त्यामुळे त्यांच्यासमोर अन्न, वस्त्र व भावनिक आधाराची मोठी समस्या उभी ठाकते. ‘तर्पण’ या संस्थेने अश्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली हे ईश्वरीय कार्य असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आज ही अनाथ मुले आत्मनिर्भर होऊन इतरांना देखील मार्गदर्शन करीत आहेत हे त्यांचे कार्य स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेल्या अनाथ मुलांचा जीवन संघर्ष दाखविणाऱ्या तर्पण गीताचे प्रकाशन करण्यात आले.

श्रीकांत भारतीय यांनी मनोगत व्यक्त केले तर तर्पणच्या मुख्याधिकारी सारिका महोत्रा यांनी आभार प्रदर्शन केले.